पवार यांनी सोमवारी सकाळी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला रोहित पवार यांनी तीव्र शब्दांत उत्तर दिले. याशिवाय दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, बारामती लोकसभा मतदारसंघावरही त्यांनी भाष्य केले. ‘अजित पवार सर्वाधिक क्षमता असलेले लोकनेते आहेत. भाजप लोकनेत्यांना जवळ करून त्यांना संपवते. आगामी काळात भाजप अजित पवारांची ताकद कमी करेल,’ अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
‘नाशिक येथील कार्यक्रमात अजितदादांचा फोटो नव्हता. चार ते पाच लोक त्यांना व्हिलन बनविण्याचे काम करीत आहेत. विकासासाठी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेल्या नेत्यांनी त्यांच्याकडे पद असताना काय केले,’ असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. भाजपने योग्य पद्धतीने डाव खेळला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता जपण्यासाठी शिवसेना पक्ष काढला. मात्र, भाजपने तो फोडला. भाजपच्या विरोधात राज्यात, देशात वातावरण असून, त्यावर कोणीही बोलू नये, विरोधकांनी आपसात गुंतून राहावे, यासाठी आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आली,’ असेही पवार म्हणाले.
सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार उभे राहणार नाहीत. अजित पवार तसा कोणताही निर्णय घेणार नाहीत. बारामती लोकसभा मतदारसंघात कोणीही सुप्रिया सुळे यांच्याविरोधा प्रचार केला तरी, सुळे या निवडून येतील, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.
वळसे पाटील यांच्यावर टीका
‘मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या वयावरून टीका केली आहे. एखादी भूमिका घेण्यासाठी आणि नात्याचे महत्त्व जपण्यासाठी वय कधीपासून आडवे यायला लागले. माझे वय ३७ वर्षे असून, वळसे पाटील यांचा राजकीय अनुभव ४० वर्षांचा आहे. पवारांसाहेबांसोबत ४० वर्षे राहूनही त्यांना साहेबांची भूमिका कळाली नसेल, तर मी कसा चुकीचा आहे,’ असा सवालही रोहित पवार यांनी केला. दिलीप वळसे पाटील यांनी मला आंबेगाव येथून उभे राहण्याबाबत विचारले होते. मात्र, हे विचारण्यापाठीमागे त्यांचे व्यक्तिगत कारण कारणीभूत होते. हे कारण मी जाहीररीत्या सांगणार नाही. पाण्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी केलेल्या टीकेला मी आंबेगावमध्येच जनतेसमोर उत्तरे देणार आहे, असेही रोहित पवार यांनी सांगितले.