• Mon. Nov 25th, 2024

    PMP बस चालकांच्या मग्रुरीचा खुद्द अध्यक्षांनीच घेतला अनुभव; ऑन द स्पॉट कारवाईचे आदेश, काय घडलं?

    PMP बस चालकांच्या मग्रुरीचा खुद्द अध्यक्षांनीच घेतला अनुभव; ऑन द स्पॉट कारवाईचे आदेश, काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : विश्रांतवाडी येथील बसथांब्यावर सोमवारी काळा टी शर्ट घातलेली एक व्यक्ती पुणे स्टेशनला जाणारी बस थांबवण्याचा प्रयत्न करीत होती… सामान्य प्रवाशांना नेहमी येणारा अनुभव त्यांच्याही नशिबी येतो… ते पाहून ती व्यक्ती बसच्या मागे धावण्यास सुरुवात करते… बसमध्ये प्रवासी कमी असूनही चालकाने बस तशीच दामटवली… बस काही अंतरावर पुढे जाते न तोच चालकाला आणि वाहकाला एक अनपेक्षित आणि मोठा धक्का बसतो. मागील थांब्यापासून बसच्या मागे धावणारी व्यक्ती दुसरी, तिसरी कुणी नसून, ‘पीएमपी’चे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह असल्याचे त्यांच्या लक्षात येते आणि त्यांचे चेहरे पडतात.

    ‘पीएमपी’च्या नूतन अध्यक्षांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर रविवारी सकाळी ५० रुपयांचा पास काढून सामान्य प्रवाशांप्रमाणे बसमधून प्रवास केला. ‘पीएमपी’च्या या प्रवासात त्यांना काही चांगले आणि काही वाईट अनुभव आले. सिंह रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मनपा ते आळंदी बसमध्ये शिवाजीनगर येथून बसले. शिवाजीनगरमध्ये बसमध्ये चढल्यानंतर ते विश्रांतवाडी येथे उतरले. बसमध्ये गर्दी असल्यामुळे त्यांनी उभे राहून प्रवास केला. विश्रांतवाडी येथे उतरल्यानंतर ते परत निघण्यासाठी बसची वाट पहात होते. दरम्याान, विश्रांतवाडी ते पुणे स्टेशन या बसला त्यांनी हात केला. तरी ती थांबली नाही. त्यानंतर सिंह आळंदी ते स्वारगेट बसमधून साधू वासवानी चौकात आले.

    ‘पासची नियमित तपासणी नाही’

    ‘प्रवासामध्ये एक व्यक्ती चुकीच्या बसमध्ये बसली. त्या वेळी वाहकाने तत्काळ पुढील थांब्यावर बस उभी केली आणि त्यांना योग्य बसविषयी मार्गदर्शन केले. मी ५० रुपयांचा पास काढला होता. तो दोन ते तीन वेळा तपासला गेला,’ असा अनुभव आल्याचेही सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
    चालकाचा निष्काळजीपणा अन् स्कूल बसमध्ये २ तास अडकली चिमुरडी; रडून रडून घामाघूम, नंतर घडलं असं…
    ‘त्या’ चालकावर कारवाई

    ‘पीएमपी’चे अध्यक्ष सिंह यांनी विश्रांतवाडी परिसरात बसला हात केल्यानंतर ती थांबवता पुढे निघून गेलेल्या चालकाला नोटीस बजावण्यात आली. त्याच्यावर आता कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांनी विनंती केल्यावर चालकांनी सर्व थांब्यांवर बस उभ्या कराव्यात, अशा सूचनाही सर्वांना देण्यात आल्या आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed