म. टा. प्रतिनिधी, पुणे : रेल्वेच्या ‘एसी चेअर कार’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’ गाड्यांमधील तिकीटदरामध्ये २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याच्या निर्णयाचा पुण्यातील प्रवाशांना कोणताही फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वे बोर्डाने ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रतिसाद असलेल्या गाड्यांमध्येच ही सवलत देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पुण्यातून ‘वंदेभारत’सह धावणाऱ्या इतर प्रीमियम रेल्वेगाड्यांना दररोज ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे पुण्यातील प्रवाशांची निराशा होणार आहे.
रेल्वे बोर्डाने ‘एसी चेअर कार’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’च्या रेल्वे गाड्यांच्या तिकीटदरामध्ये २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या ‘वंदेभारत’सह इतर एक्स्प्रेस गाड्यांचे तिकिटाचे दर २५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात. मात्र, रेल्वे बोर्डाने ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रतिसाद असलेल्या गाड्यांनाच हा निर्णय लागू असणार असल्याचे म्हटले आहे. विशेष रेल्वेगाड्यांनाही हा निर्णय लागू होणार नसल्याचे म्हटले आहे.

पुण्यातून दररोज डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, प्रगती या ‘एसी चेअर कार’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’च्या गाड्या मुंबईसाठी धावतात. मुंबई-सोलापूर ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ही पुण्यातून जाते. या सर्व गाड्यांना दररोज ८० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवाशांचा प्रतिसाद असतो. काही गाड्यांना तर ९५ ते १०० टक्के प्रतिसाद आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाच्या निर्णयाचा पुण्यातील प्रवाशांना काहीही फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वेच्या सर्व विभागातील मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांना तिकीटदरामध्ये सवलत देण्याचे अधिकार दिले आहेत. हे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक २५ टक्क्यांपर्यंत तिकीटदरात कपात करू शकतात, असे आदेशामध्ये म्हटले आहे. त्यामुळे थेट २५ टक्के तिकीट कमी होईल याचीही शाश्वती नाही.