खार येथे राहणाऱ्या एका महिलेने समाजमाध्यमावर एक जाहिरात पाहिली. जाहिरातीच्या बटनावर क्लिक केल्यास आयफोन १४ प्रो मिळेल असे सांगण्यात आले. बटनावर क्लिक केल्यावर एका व्यक्तीने त्यांना फोन केला. हा मोबाइल दुबईवरून येणार असून आपली ऑर्डर निश्चित करण्यासाठी दोन हजार रुपये पाठवावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार या महिलेने ऑनलाइन पैसे पाठविले. त्यानंतर आणखी एकाचा काही वेळाने फोन आला.
त्याने दिल्ली विमानतळावरून बोलत असल्याचे सांगून, दुबईहून आलेल्या आपल्या नावाच्या पार्सलमध्ये आयफोन, सोने आणि आणि रोख रक्कम असल्याचे सांगितले. विश्वास बसावा, म्हणून त्याने त्या वस्तूंचा व्हिडीओ पाठवला. त्या पार्सलवर १८ हजार रुपये आयकर भरावा लागेल असे सांगत पैशांची मागणी केली. महिलेने ही रक्कमही पाठवली. त्यानंतर यासाठी सरकारची परवानगी घ्यायची असून त्यासाठी ४५ हजार रुपये मागून घेतले. पुढे पैसे देण्यास नकार देताच, दिल्ली पोलिसांना घरी घेऊन येऊ अशी धमकी देण्यात आली. घाबरून महिलेने आणखी २० हजार रुपये पाठविले आणि नंतर पोलिसांत धाव घेतली.
विलेपार्ले येथील तरुणाला इन्स्टाग्रामवर एका महिलेने रिक्वेस्ट पाठवली. ती स्वीकारातच दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. एकमेकांच्या मोबाइल क्रमांकाची देवाणघेवाण झाल्यानंतर महिलेने व्हिडीओ कॉल केला. त्यामध्ये महिलेने स्वत:ला विवस्त्रावस्थेत दाखवताच तरुणाने कॉल बंद केला. काही वेळाने तरुणाला अश्लील क्लिप आली.
समोरून एक फोन आला आणि समोरील व्यक्तीने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ५६ हजार रुपये उकळले. त्यानंतर दिल्ली गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगून एका अधिकाऱ्याने फोन केला. युट्यूब, फेसबुक तसेच इतर ठिकाणी व्हिडीओ अपलोड करण्यात आला असून तो काढण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने पोलिस ठाण्यात तक्रार केली.
डुप्लिकेट पासपोर्ट, ड्रग्ज
भायखळा येथील एका खासगी कंपनीतील अधिकाऱ्याने कंपनीचे एक पार्सल तैवान येथे पाठविले. काही दिवसांनी त्याला विमानतळावरून फोन आला आणि आपण पाठविलेल्या पार्सलमध्ये पाच पासपोर्ट आणि ड्रग्ज सापडल्याचे सांगण्यात आले. अटक टाळण्यासाठी विमानतळावरील तोतया पोलिसांनी या अधिकाऱ्याकडून टप्याटप्याने सुमारे दोन लाख रुपये घेतले.
डीसीपी राठोड बोलतोय
मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे काम करणाऱ्यास अनोळखी क्रमांकावर व्हिडीओ कॉल आला. समोरील महिलेने स्वतःचे कपडे काढतानाच त्यालाही विवस्त्र होण्यास भाग पाडले. व्हिडीओ कॉल बंद केल्यानंतर त्या महिलेने अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवले. त्यानंतर आधी युट्यूबमधील कथित अधिकारी आणि नंतर डीसीपी राठोड नाव सांगणाऱ्या व्यक्तीचा फोन आला. त्यांनी अटकेची धमकी देत या कर्मचाऱ्याकडून ७१ हजार रुपये उकळले.