• Sat. Sep 21st, 2024

शेतकऱ्यांनो त्वरा करा; या योजनेसाठी उरला थोडाच कालावधी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो त्वरा करा; या योजनेसाठी उरला थोडाच कालावधी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. २०२३-२४ या वर्षात राज्यात ही पीकविमा योजना बीड पॅटर्न (८०:११०) आधारित राबविली जाणार आहे. खरिपासाठीच्या पीक विमा योजनेत ३१ जुलैपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत विमा कंपनीवर विमा हप्त्याच्या ११० टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाईचे दायित्व राहणार असून, यापेक्षा जास्त नुकसान भरपाई राज्य सरकार देणार आहे.

या योजनेत भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, भुईमूग, सोयाबीन, कारळा, मूग, उडीद, तूर, कापूस व कांदा या पिकांचा समावेश आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना राबविली जाणार आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी कंपनीच्या १८००११८४८५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा जवळील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन गंगाथरन यांनी केले आहे.

पीक- विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर)
भात पिकासाठी ४९,५०० एवढी रक्कम मिळणार आहे. ज्वारी पिकासाठी ३०,००० मिळतील. बाजरीला ३०,००० , नाचणी १३,७५०, मका ३५,५९८, तूर ३६,८०२, मूग २०,०००, उडीद पिकाला २०,०००, भुईमूगाला ४२,९७१, सोयाबीनला ४९,५००, कारळे १३,७५०, कापसाला ४९,५०० आणि खरीप कांद्याला ८१,४२२ विम्याची रक्कम मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed