दोन वर्षांपूर्वी झालेल्या या भयंकर घटनेत अनेकांचे जीव गेले कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाले. दोन वर्षानंतरही महाड तालुक्यातील तळीये येथील सगळया ग्रामस्थांना अद्यापही पुनर्वसन करून हक्काची घरे मिळालेली नाहीत. या घरांचे बांधकाम म्हाडाकडून सुरू आहे. दरम्यान, अलिकडेच बांधण्यात आलेल्या घरांपैकी एका नवीन घराचा एका बाजूचा पाया खचल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वीच घडली आहे.
कोकण म्हाडाकडून ही सगळी घरे पुनर्वसीत कुटुंबाना नव्याने बांधून देण्याचे काम सुरू आहे. जवळपास सुमारे २३१ घरांपैकी पहिल्या टप्प्यात ६६ कुटुंबाना प्लॉटचे अलॉटमेंट करण्यात आलं आहे. याठिकाणी नवीन घरांचे बांधकाम म्हाडाकडून अद्याप सुरू आहे. त्यामुळे या नवीन घरांचा ताबा अद्याप कोणालाही देण्यात आलेला नाही, अशी माहिती महाड तालुक्याचे तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली आहे.
तळीये गावातील बचावलेल्या आणि बेघर झालेल्या कुटुंबाना याच भागाजवळ सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोकण म्हाडाकडून या ठिकाणी नव्या घरांचे बांधकाम सुरू आहे. सध्या ही बेघर झालेले सगळ्या कुटुंबांची याच ठिकाणाजवळच शासनाकडून देण्यात आलेल्या कंटेनर हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर यातील काही कुटुंब मुंबई येथे तर काहीजण नातेवाइकांकडे वास्तव्यास आहेत.
या सगळ्या कुटुंबाला कोकण म्हाडाकडून शासन नव्याने घर बांधून घेणार आहे. मात्र, अद्यापही काम सुरू असल्याने बेघर झालेल्या कुटुंबाना स्वतःची हक्काची घरे दोन वर्षानंतरही मिळू शकलेली नाहीत. या घराचा एका बाजूचा पाया नेमका कसकाय खचला याची माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. या ठिकाणी जाऊन महाडचे तहसीलदार महेश शितोळे आणि प्रशासनाने भेट देऊन कामाची पाहणी केली आहे. या सगळ्या कामावर प्रशासन लक्ष ठेवून आहे.