नाशिकसह त्र्यंबकेश्वर आणि परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने त्रंबकेश्वर शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. पहिल्याच पावसात त्र्यंबकेश्वर गावातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी पाहू लागल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्र्यंबकेश्वर मधील रस्त्यांनी एखाद्या नाल्या आणि ओढ्या प्रमाणात रूप धारण केलं होतं. या सगळ्या परिस्थितीमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये आलेल्या भाविकांना देखील चांगलाच पाऊस अनुभवयास मिळाला.
शनिवारी नाशिक शहरासह इगतपुरी, पेठ, त्रंबकेश्वर, सुरगणा या तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर उर्वरित तालुक्यात पावसाचा जोर कमी असल्याचे दिसत आहे. यामुळे आता घाटमाथा परिसरातील भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या महिनाभरापासून शेतकरी देखील पावसाच्या प्रतीक्षेत होते. पावसामुळे खरीप हंगामातील शेतीचे कामे रखडली होती. परंतु आता उशिराने पावसाने दाखल होत आता जोर धरला आहे.
शेवटच्या आठवड्यात दाखल झालेला पाऊस सुरुवातीला रिमझिम स्वरूपात पडत होता. परंतु, पावसाने आता जोर धरला असून धरणातील पाणी पातळी देखील उंचावण्यास सुरुवात झाली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसाने त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील लहान मोठ्या विक्रेत्यांची देखील धावपळ झाली. मुसळधार झालेल्या पावसाने दैनंदिन व्यवहारावर देखील परिणाम झाला.
मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिक शहरावर पाणी कपातीचे संकट घोंघावत होते. परंतु पावसानं उशिरा दाखल होत नंतर जोर धरल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी उंचवयास सुरुवात झालेली आहे यामुळे पुढील संभाव्य पाणी कपात टळण्याची शक्यता दिसत आहे.