आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी आदित्य यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मुंबईत भगवं वादळ आलं आहे. मुंबई महापालिकेवर भगवा झेंडाच फडकणार आहे, असा निर्धार यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन महानगरपालिका अधिकाऱ्यांना लक्ष्य केले. तुम्ही जी काही चोरी केली आहे, ती आमच्यासमोर आली आहे. तुमच्या फाइल्स बनवल्या आहेत. आमचं सरकार आल्यावर आम्ही आणि पोलीस येऊन तुमची जागा दाखवणार आहे. पुढची फाइल सही करताना लक्षात ठेवा. दिल्लीचे कितीही आदेश आले, तरी मुंबईला लुटू नका, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. तसेच मुंबईतील रस्ते हे पाच लोकांसाठी तयार करण्यात येत असून पाच लोकांना त्याचं काम दिलं जात आहेत असा आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतील रस्त्यांचं काम हे पाच झोनमध्ये केलं जात आहे. पाच लोकांना काम दिलं जाऊन त्यामध्ये कमिशन खाल्लं जात आहे. सर्वप्रथम यांनी रस्त्यांच्या किमती वाढवल्या, टेंन्डरमध्ये घोटाळा केला. पाच हजार कोटींच्या रस्त्याची किंमत ६०८० कोटी रुपयांपर्यंत वाढवली. त्यातून यांनी ४० टक्के कमिशन खाल्ले, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
राहुल कनाल यांचा शिंदे गटात प्रवेश
एकीकडे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढला जात असताना दुसरीकडे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या राहुल कनाल यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी राहुल कनाल यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. गेल्या ३२ वर्षांपासून माझे वडील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची भेट घडवून आणली होती. मला चांगल्याप्रकारे आठवत आहे. कोरोना काळात वांद्रे पश्चिम, खार या भागात आम्ही सर्वजण माणसं तसेच जनावरांना अन्न खाऊ घालत होतो. पोलीस आणि मुंबई महापालिकादेखील आमच्यासोबत काम करत होती. आम्ही ठरवलं होतं की, मुंबईत जितके जनावरं आहेत त्यांना अन्न खाऊ घालू. तुम्ही किंवा मी रस्त्यावर नव्हतो तेव्हा त्यांना अन्न खाऊ घालणारं नव्हतं. तेव्हा आपण आम्हाला वांद्रेची एमआयडीसीची संपूर्ण जागा दिली होती, अशी आठवण राहुल कनाल यांनी सांगितली.