• Sun. Sep 6th, 2026

विभागीय आयुक्तांकडून जनसहयोग संस्थेतील वृक्षांची पाहणी – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 15, 2026
विभागीय आयुक्तांकडून जनसहयोग संस्थेतील वृक्षांची पाहणी – महासंवाद

छत्रपती संभाजीनगर, दि. 15 (विमाका) : विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज येथील जनसहयोग या सेवाभावी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या ‘संपूर्ण वन’ जैवविविधता उद्यानाला भेट देऊन तेथील विविध वृक्षसंपदेची पाहणी केली. यावेळी त्यांनी वड वन, औषधी वनस्पती उद्यान, तसेच सर्व धर्म वाटिका अशा सुमारे 20 प्रकारच्या वाटिकांमधील विविध वृक्ष व वनस्पतींची माहिती जाणून घेतली.

अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी पालन केंद्र, पडेगाव परिसरातील जवळपास 25 एकर क्षेत्रात विकसित करण्यात आलेल्या या वृक्षराईत सुमारे 400 प्रकारच्या देशी, दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींच्या प्रजातींचे संवर्धन करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी या वृक्षसंपदेची प्रत्यक्ष पाहणी करून वृक्षारोपण आणि संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती घेतली.

यावेळी त्यांनी प्रामुख्याने देशी प्रजातींची लागवड, रोपांची आरोग्यस्थिती, ठिबक सिंचनाची व्यवस्था आणि जैवविविधता संवर्धनासाठी केलेले प्रयत्न यांचे कौतुक केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच औषधी वनस्पतींचे जतन करण्यासाठी अशा उपक्रमांना अधिक बळ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या संस्थेला आर्थिक व तांत्रिक सहाय्य मिळावे यासाठी सामाजिक वनीकरण विभागासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जनसहयोग सेवाभावी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कर्मचारी तसेच ज्येष्ठ पत्रकार अण्णा वैद्य उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed