• Sat. Jun 13th, 2026
    Dharashiv मध्ये जीव घेणारा विचित्र अपघात, भरधाव बोलेरो पाठीमागून वॅगनारला धडकली, नंतर होंडा सीटीला समोरुन धडक

    धाराशिव जिल्ह्यात भीषण तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव कारने दोन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    धाराशिव : धाराशिव तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाटोदा–करजखेडा परिसरात रविवारी दुपारी भीषण तिहेरी अपघात घडला. लातूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या बोलेरो वाहनाने प्रथम वॅगनार कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या एम.एच -४५- ए. झेड.५४४९ या नंबच्या बोलेरोने कठडा तोडून तुळजापूरकडे येत असलेल्या होंडा सिटी कारला समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात होंडा सिटी कारमधील एक जणाचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत.

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो गाडी लातूरच्या दिशेने सुसाट वेगाने जात होती. यावेळी मद्यपान केलेल्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरोने पुढे असलेल्या वॅगनार कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर बोलेरो वाहन आणखी वेगाने पुढे जाऊन कठडा तोडून समोरून लातूरच्या दिशेला येणाऱ्या होंडा सिटी कारला समोरासमोर धडकली. या समोरासमोर झालेल्या धडकेत होंडा सिटी कारचे मोठे नुकसान झाले.

    अपघातात एकाचा मृत्यू, चार जखमी

    या अपघातात होंडा सिटी कारमधील जीवन वसंत पाटील (वय ७०) यांचा मृत्यू झाला. तर नित्यानंद मोहन बुके (वय ३५), मोहन बुके (वय ५५), अर्जुन पटुळे (वय ५५) आणि आणखी एक अनोळखी पुरुष (अंदाजे वय ४०) असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिवच्या शासकीय जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की काही काळ घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे पाठविण्याची व्यवस्था केली.दरम्यान, अपघातामुळे काही काळ तुळजापूर–लातूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघाताबाबत पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पाटोदा–करजखेडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा