• Fri. Mar 20th, 2026
    Jalna News : रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, जालन्यातील घटना

    शहरातील श्री संत गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणाऱ्या ३३ वर्षीय अमोल दोरके या कर्मचाऱ्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

    जालन्यातील रुग्णालयाच्य ऑपरेशन थिएटरमध्ये कर्मचाऱ्याचा मृतदेह(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : जालना शहरातील नामांकित श्री संत गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आज दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

    ऑपरेशन थिएटरमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळले

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऑपरेशन थिएटर विभागात काम करणारे कर्मचारी अमोल दोरके (वय ३३) हे आज दुपारच्या सुमारास संशयास्पद अवस्थेत आढळून आले. रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तातडीने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची पाहणी केली तसेच पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

    मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

    पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृत व्यक्तीची ओळख अमोल दोरके अशी पटली असून ते रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटर विभागात काम करत असल्याचे समोर आले आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा मृत्यू नैसर्गिक आहे की यामागे घातपात अथवा अपघात आहे, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

    Maharashtra TimesPune Crime : सासरी छळ, सातत्यानं पैशांची मागणी; 22 वर्षीय वैष्णवीनं जीवन संपवलं, सुखी संसाराचं स्वप्न अधुरंच, पतीसह चौंघावर गुन्हा दाखल

    नातेवाईकांची गर्दी, परिसरात तणाव

    दरम्यान, ही घटना समजताच मृताच्या नातेवाईकांनी तसेच परिचितांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी रुग्णालय परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

    पोस्टमार्टमनंतर कारण स्पष्ट होणार

    या संदर्भात माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सांगितले की, “घटनास्थळी तपास सुरू असून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.”

    सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून पुढील माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. अशी माहिती अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना यांनी दिली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा