• Fri. Mar 20th, 2026
    Pune Crime : कॉलेजसमोर किरकोळ वादातून विद्यार्थ्यावर भीषण हल्ला, वाघोली पोलिसांकडून तपास सुरू

    वाघोली परिसरात किरकोळ वादातून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या थरारक घटनेत नागेश जगताप हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, वाघोली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    पुण्यातील वाघोलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात किरकोळ वादातून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “तू मला शिवी का दिलीस?” या कारणावरून कॉलेजसमोरच विद्यार्थ्यावर वार करण्यात आले. हल्ल्यात कोयता थेट विद्यार्थ्याच्या डोक्यात रुतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी तिघांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

    नागेश जगताप असं जखमी विद्यार्थ्याचं नाव असून तो कॉम्प्युटर सायन्सच्या चौथ्या वर्षाला शिकत आहे. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास नागेश आणि त्याचा मित्र सिद्धेश भोसले हे दोघे कॉलेजसमोरील चहाच्या टपरीवर बसले होते. त्याचवेळी त्यांचा ओळखीचा मंगेश सांगळे हा आपल्या दोन मित्रांसोबत दुचाकीवरून तिथे आला.

    “तू मला शिवी का दिलीस?” असा सवाल करत मंगेशने अचानक वाद घालायला सुरुवात केली. काही समजायच्या आतच त्याच्या दोन साथीदारांनी नागेशवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. नागेशवर कोयत्याने एकामागोमाग वार करण्यात आले. या हल्ल्यात एक कोयता थेट नागेशच्या डोक्यात रुतून बसला.

    Maharashtra TimesJalna News : रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, जालन्यातील घटना

    मित्राला वाचवण्यासाठी सिद्धेश भोसले मध्ये पडला, पण हल्लेखोरांनी त्यालाही सोडलं नाही. त्याच्यावरही वार करत त्याच्या हातांना आणि दंडाला गंभीर दुखापत केली. घटनास्थळी गोंधळ उडताच आरोपींनी दोन कोयते तिथेच टाकले आणि पळ काढला. जखमी नागेशच्या डोक्यात कोयता अडकलेला असतानाच त्याला आणि सिद्धेशला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर नागेशला पुढील उपचारासाठी खराडीतील रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

    या प्रकरणी सिद्धेश भोसले यांच्या तक्रारीवरून वाघोली पोलीस ठाण्यात मंगेश सांगळे आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू असून कॉलेजसमोर भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.

    पुण्यातील वाघोली परिसरात किरकोळ वादातून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “तू मला शिवी का दिलीस?” या कारणावरून कॉलेजसमोरच विद्यार्थ्यावर वार करण्यात आले. हल्ल्यात कोयता थेट विद्यार्थ्याच्या डोक्यात रुतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी तिघांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा