• Sat. Sep 21st, 2024
PMP बस चालकाचा प्रताप; भर पावसात प्रवाशांना बसमधून खाली उतरवले

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘सीएनजी’ भरण्यासाठी चालत्या बसमधून उतरविण्याचे प्रकार वाढले असून, त्यामुळे प्रवाशांच्या मनस्तापात भर पडत आहे. नरवीर तानाजी वाडी येथील ‘सीएनजी डेपो’त शुक्रवारी दोन बसमधील प्रवाशांना भर पावसात उतरवून चालक ‘सीएनजी’ भरण्यासाठी गेल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

‘पीएमपी’च्या ताफ्यातील ‘सीएनजी’ बसमध्ये गॅस भरण्यासाठी दुपारी आणि रात्री शिफ्ट संपल्यानंतर कोथरूड, भोसरी आणि नरवीर तानाजी वाडी येथे बस घेऊन जाणे अपेक्षित आहे. मात्र, ‘पीएमपी’चे चालक आणि वाहक मध्येच गॅस संपत आल्याचे कारण देऊन प्रवाशांना मध्येच उतरवत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही आल्या होत्या. त्यावर ‘पीएमपी’ प्रशासनाने ड्युटी सुरू होण्याअगोदर ‘सीएनजी’ भरून घेण्याच्या सूचना चालकांना दिल्या होत्या. या सूचनांना केराची टोपली दाखवून प्रवाशांना भररस्त्यात उतरवून ‘सीएनजी’ भरण्याच्या घटना सर्रास सुरू आहेत.

Buldhana Bus Accident: पुण्याहून लेकाच्या अ‍ॅडमिशनसाठी नागपूरला, परतताना अपघात अन् आई वडिलांसह लेकीचा मृत्यू
गेल्या तीन दिवसांपासून नरवीर तानाजी वाडी येथील ‘सीएनजी डेपो’च्या बाहेर प्रवाशांना रस्त्यात उभे करून काही बसचालक ‘सीएनजी’ भरण्यासाठी जात असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी १५ ते २० प्रवासी भर पावसात उभे असल्याचे दिसून आले. ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांचे अशा घटनांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे असे प्रकार वाढत आहेत.

मी स्वारगेट येथून स्वारगेट ते आळंदी बसमध्ये बसलो. शिवाजीनगर येथे आल्यानंतर चालकाने बसमध्ये ‘सीएनजी’ भरायचा असल्याचे सांगून आम्हाला सीएनजी डेपोसमोरील रस्त्यावर उतरविले. आम्ही येण्याअगोदरही काही प्रवासी रस्त्यावर उभे होते. त्यांच्याही बसमध्ये ‘सीएनजी’ भरायचा असल्याने त्यांना उतरविण्यात आले होते. प्रवाशांना रस्त्यात उतरविणे योग्य नाही. प्रवासी भरपावसात उभे असतात. चालकांनी अगोदरच बसमध्ये ‘सीएनजी’ भरावा; जेणेकरून प्रवाशांचे हाल होणार नाहीत. – बाळासाहेब नरवडे, प्रवासी

‘सीएनजी’ भरण्यासाठी प्रवाशांना मध्येच उतरविण्याच्या तक्रारी आल्यानंतर चालक आणि डेपो मॅनेजरला सूचना दिल्या होत्या. ‘सीएनजी’ भरूनच बस मार्गावर सोडावी, असे सांगितले होते. मात्र, पुन्हा असे प्रकार घडत असतील तर कडक सूचना दिल्या जातील; तसेच, संबंधितांवर कारवाई केली जाईल.

– सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed