म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जे.जे. रुग्णालयामधील औषध नमुन्यांच्या चाचणी प्रक्रियेतील अनियमिततांबाबत स्थापन केलेल्या चौकशी समितीने २९ जणांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यातील सात जणांचे जबाब समितीने नोंदवले आहेत. त्यापैकी काहीजणांनी ‘पार्श्व लाइफ सायन्स’ या कंपनीने अद्याप पैसे दिले नसल्याचे सांगितले. तसेच चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या ज्या रुग्णांना नियमानुसार भरपाई दिली जाते तीदेखील दिलेली नाही. त्यामुळे या औषध चाचण्या नियमांमध्ये राहून करण्यात आल्या का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
चौकशी समितीने औषध चाचण्यांसाठी ज्यांना कंपनीने पैसे दिले ते त्यांनी कुठे भरले यासंदर्भातील विस्तृत माहिती, कागदपत्रे उपलब्ध करण्याचेही निर्देश दिले आहेत. औषध चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या या संबधितांना सामंजस्य करारानुसार रुग्णांना देण्यात येणारा मोबदला, संस्थेला देण्यात येणारे पैसे, टीडीएस प्रमाणपत्र या संदर्भातील सविस्तर तपशील देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ईडीने घातलेल्या छाप्यांचे धागेदोरे जे.जे. रुग्णालयापर्यंत पोहोचले असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी जे.जे. रुग्णालयातील डॉ. हेमंत गुप्ता यांचे नाव पुढे आले आहे. ते वैद्यकीय शास्त्र विभागामध्ये युनिट प्रमुख आणि मानसेवी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. सन २०१८पासून ते ‘जे.जे.’च्या औषधनिर्माण शास्त्र विभागातून ‘पार्श्व लाइफ सायन्स’ या कंपनीच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा करत असल्याचे उघडकीस आले आहे.
डॉ. गुप्ता यांचे नाव उघडकीस येताच जे.जे. रुग्णालय प्रशासनाने त्यांचे कार्यालय आणि औषधनिर्माण शास्त्र विभागातील तीन कक्ष सीलबंद केले आहेत. तसेच, डॉ. हेमंत गुप्ता यांना वैद्यकीय शास्त्र विभागाच्या युनिट प्रमुख पदावरून हटवून त्यांच्या जागी डॉ. मधुकर गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.