• Mon. Nov 25th, 2024
    ट्रॅक्टर कालव्यात उलटून मैत्रिणींचा अंत, चौघींवर एकत्रच अंत्यसंस्कार, गावाला घास गोड लागेना

    सातारा : शेतातील काम संपवून कारंडवाडी येथील चार महिला ट्रॅक्टरमधून घरी जात होत्या. यावेळी कालव्यात ट्रॉली पलटी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. शनिवारी घडलेल्या घटनेमुळे शोकसागरात बुडालेले कारंडवाडी गाव अद्याप सावरलेले नाही. या चारही मृत महिलांवर शोकाकुल वातावरणात कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील तीन महिला एकाच भावकीतील होत्या. परिसरातील शेतांमध्ये त्या नेहमी पैरा पद्धतीने काम करण्यासाठी जात असत. शनिवारी या चारही जणींचा अखेरचा पैरा ठरला.

    सातारा शहरापासून कारंडवाडी हे ८ ते १० किलोमीटरवर गाव आहे. सुमारे एक हजार उंबरठा असून लोकसंख्या तीन ते चार हजार आहे. शेती व एमआयडीसी हे येथील लोकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. बहुतांशी पुरुष एमआयडीसीमध्ये तर महिला शेतीच्या कामासाठी जातात.

    दाम्पत्याच्या वादात मध्यस्थी भोवली, वर्ध्यात वृद्धाला बसमधून खाली उतरवलं, आठ-दहा जणांची मारहाण
    नेहमीप्रमाणे या चारही महिला शनिवारी शेतीच्या कामासाठी गुलाब माने यांच्या शेतात गेल्या होत्या. शेतात जाण्या- येण्याचा प्रवास माने आपल्या ट्रॅक्टर- ट्रॉलीमधून करत होते. सायंकाळी नेहमीच्याच रस्त्यावरून घरी येत असताना महाडिक कॉलनीजवळ कॅनॉलवरील अरुंद पुलावरून जात असताना पावसाने निसरड्या झालेल्या रस्त्यावरून ट्रॉली घसरून कॅनॉलमध्ये पडली. त्यात अरुणा शंकर साळुंखे (वय ५८), लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय ६५) व उल्का भरत माने (वय ५५) या चौघी जणींचा मृत्यू झाला, तर यात एक महिला जखमी झाली होती.

    भयानक अपघात! ट्रकच्या धडकेत एसटीच्या समोरील भागाचा चुराडा

    या घटनेची माहिती समजतात सारं गाव घटनास्थळी दाखल झाले होते. या महिलांचे मृतदेह पाहून कुटुंबिय व नातेवाईकांचे अश्रू अनावर झाले होते. अवघी कारंडवाडी शोकसागरात बुडाली होती. पोलीस तपासानंतर चारही महिलांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते. ते रविवारी पहाटे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे रविवारीही गावात निरव शांतता पसरली होती.

    दोन दिवसांपूर्वी लग्न, माहेरी येऊन नवविवाहितेची प्रियकरासह आत्महत्या, मेहंदीच्या हातांनी आयुष्य संपवलं
    शोकाकूल वातावरणातच मृत चारही महिलांवर संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच गावातील चारही महिलांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची ही दुर्दैवी घटना पहिल्यांदाच घडली होती. त्यामुळे नातेवाईकांसह गावातील नागरिकांनाही हुंदका आवरत नव्हता. त्यांचे अश्रू अनावर झाले होते. अंत्यसंस्काराला विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी चारही कुटुंबातील नातेवाईकांचे सांत्वन केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *