शिर्डी जवळील पुणतांबा गावाने ऐतिहासिक असा शेतकरी संप पुकारला होता. याच गावातील रहिवासी शेतकरी योगेश वाणी यांनी काल कन्नडचे माजी आमदार आणि बीआरएस पक्षाचे नेते हर्षवर्धन जाधव यांचा व्हिडिओ पाहून आपला ५०० गोणी कांदा हैद्राबाद मार्केटमध्ये विक्रीसाठी नेला होता. व्हा यरल व्हिडिओमध्ये जाधव यांनी तेलंगणात कांद्याला १८०० ते २००० पर्यंत भाव मिळत असल्याचे सांगितले होते. मात्र, कांदा उत्पादक शेतकरी योगेश वाणी यांना प्रत्यक्षात ८०० ते १ हजार रुपयांचा भाव मिळाला असल्याचे म्हटले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत योगेश वाणी म्हणत आहे की, हर्षवर्धन जाधव यांचा व्हिडिओ पाहून आम्ही हैदराबाद मार्केटला ५०० गोणी कांदा घेऊन आलो. मात्र, या ठिकाणी आम्हाला ८०० ते १ हजार रुपयांपर्यंत क्विंटलला भाव मिळाला असून येथे कांदा आणण्यासाठी मला ३ रुपये किलो असा खर्च आलेला आहे. महाराष्ट्रात जी आडत नाही या ठिकाणी सहा टक्के आडत शेतकऱ्यांकडून कापली जाते. सगळं खर्च वजा करून मला साडे पाचशे ते सहाशे रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळालेला आहे, असंही योगेश वाणी म्हणाले.
महाराष्ट्रापेक्षा तेलंगणात कांद्याला भाव चांगला मिळत आहे म्हणून राज्यातील अनेक शेतकरी तेथे गेले मात्र अनेक शेतकरी निराश होऊन परतलेले आहेत. तर, काहींच्या डोळ्यात पाणी आलेले आहे. महाराष्ट्रात दहा ते अकरा रुपये कांद्याला भाव असून खर्चही कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कांदा आपल्या राज्यातच विकावा अशी माझी कळकळीची विनंती आहे, असे देखील योगेश वाणी यांनी आपल्या व्हिडिओतील मनोगतात म्हटले आहे.