बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही कधीही उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही. आदित्य हे सरकारमध्ये मंत्री होते. विरोधी पक्ष म्हणून आम्हाला त्यांच्यावर टीका करणे गरजेचे होते. उद्धव ठाकरे यांना माझे आव्हान आहे. तुम्ही विधान मंडळाचे सदस्य आहात. विधान मंडळामध्ये तुम्ही पीएम केअर फंडाबाबत आवाज उठवावा. मागील अधिवेशनामध्ये तुम्ही काही बोलला नाही. तुम्ही एकच दिवस अधिवेशनामध्ये आला. तुम्हाला ठाणे नागपूर येथील महापौरांचा भ्रष्टाचार माहिती आहे. तर अधिवेशनामध्ये येऊन तुम्ही ते मांडायला हवे होते. सरकार त्याची चौकशी करेल. मात्र तुम्ही अधिवेशनामध्ये येणारच नाही. तुमच्या लेटर पॅडवर हे सरकारला सांगा ना. का नुसत्या तोंडाच्या वाफा फेकायच्या.
बावनकुळे म्हणाले की, तुमच्यात जर हिम्मत असेल तर विरोधी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही हा भ्रष्टाचार समोर मांडा. जर काही चुकीचे असेल तर सरकार त्यांच्यावर कारवाई करेल. अजित दादा हे त्यांच्या पद्धतीने काम करणारे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या कामाची चुणूक अनेक वेळा मंत्रिमंडळामध्ये दाखवली आहे. त्यांना पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवावी लागणे हे दुर्दैव आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला.