• Sat. Sep 21st, 2024
पंकजा मुंडेंसाठी डबल धमाका: दोन पक्षांकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर, निर्णय घेणार?

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रात रुजण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन नव्या पक्षांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेख राव यांच्या बीआरएस पक्षाकडून पंकजा यांना पक्षात येण्याचं आवाहन केल्यानंतर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही पंकजा मुंडे यांना दिलेल्या जुन्या ऑफरची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. ‘जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना दोन वर्षांपूर्वीच मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. काही लोकांना हवेचा सुगंध आल्यावर पाऊस केव्हा येणार हे कळतं. मात्र त्याच्यापूर्वीच इम्तियाज जलील यांना कळतं. त्यामुळे पंकजा मुंडे यांना इम्तियाज जलील यांनी ही ऑफर आधीच दिली आहे. यावर भारतीय जनता पक्षामध्ये घुसमट होणाऱ्या पंकजा मुंडे यांनी विचार करावा,’ असा सल्ला एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी पंकजा मुंडे यांना दिला.

असदुद्दीन ओवेसी हे आज छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपविरोधात बैठक बोलावली होती. मात्र त्यांनी मला का बोलावलं नाही, याचे उत्तर तुम्ही त्यांनाच विचारा. पंतप्रधान अमेरिकेत गेले आहेत. अमेरिका आणि भारताचे संबंध चांगले व्हावेत, असं आम्हालाही वाटतं. विद्यार्थ्यांचे व्हिजाचे प्रश्न आहेत, ते सुटले पाहिजेत. अमेरिकेच्या माजी राष्ट्रपतींनी सांगितलं की, भारतामध्ये अल्पसंख्याक समुदायाला टार्गेट केलं जात आहे. यामुळे भारताचं नुकसान होईल.’

मोदी सरकारची माहिती देण्यासाठी पंकजा मुंडे उतरल्या परळीच्या मैदानात

‘पंकजा मुंडे बीआरएस पक्षात आल्या तर त्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील’

भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजप वाढवला. त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांचं महाराष्ट्रात मोठं वलय आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना डावलण्याचे काम केलं जात आहे. यामुळे भारत राष्ट्र समितीमध्ये अनेक मोठे नेते येत आहे. पंकजा यांनीही पक्षात प्रवेश केला तर के. चंद्रशेखर राव त्यांना न्याय देतील. कोअर कमिटीमध्ये चर्चा झाली आहे. यामुळे आम्ही पंकजा मुंडे यांना भेटायला जाणार आहोत. त्यावेळी त्यांना याबाबत प्रस्ताव देणार आहे. पंकजा मुंडे आमच्या पक्षात आल्या तर त्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील,’ असा दावा बीआरएस पक्षाचे समन्वयक बाळासाहेब सानप यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed