लहान मुलांच्या आयुष्यामध्ये पहिले गुरू आई वडील आणि त्यानंतरचे गुरु हे शाळेतील शिक्षक असतात. या दोन्ही गुरूंच्या माध्यमातून लहान चिमुकल्यांच्या आयुष्याला आकार देण्याचं काम केलं जातं. यामुळे शिक्षकांना मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक वर्षांपासून महत्त्व आहे. याचे महत्त्व ओळखून अनेक शिक्षक तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवतात आणि याचीच पावती म्हणून अनेक वेळा शिक्षकांना निवृत्तीच्या वेळेस किंवा त्यांच्या नोकरीच्या बदलीच्या वेळेस विद्यार्थी पालकांच्या प्रेमाची याची पावती मिळते. असाच अनुभव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तारू पिंपळवाडी गावात अनुभवायला मिळाला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या तारु पिंपळवाडी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत १२ वर्षांपूर्वी सतिश बाबुराव सावंत यांची बदली झाली अन् ते शाळेत रुजू झाले. सावंत यांनी तारु पिंपळवाडीमध्ये शैक्षणिक वर्ष २०१० पासून सलग १२ वर्षे नोकरी केली. या काळामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिलं. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दर्जा सुधारला. त्यासोबतच विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये देखील वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या. यामुळे अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रातही आपलं वर्चस्व दाखवू शकले. मात्र विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या या शिक्षकाची बारा वर्षे सेवा झाल्यानंतर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये बदली करण्यात आली.
शिक्षकाची बदली झाल्याचं कळताच विद्यार्थी, पालकांसह गावकऱ्यांचा विश्वास बसला नाही. त्यांनी खात्री करण्यासाठी शाळेकडे विचारणा केली. आणि ही बातमी खरी ठरली. शिक्षकाची बदली झाल्याचं कळतच विद्यार्थी आणि पालक भावुक झाले. अनेकांना अश्रू अनावर झाले. फक्त विद्यार्थी आणि पालकच नव्हते तर अनेक ज्येष्ठ नागरिकही भावुक झाल्याचे दिसले. वैजापूर येथे बदली झाल्याने सतिश सावंत यांना निरोप देताना अक्षरशः संपूर्ण गावकऱ्यांचे डोळे पाणावले..
आपल्या शिक्षकाला निरोप देताना शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांना ही अश्रू अनावर झाले. शाळेच्या प्रगतीचा आलेख आणि विद्यार्थ्यांना व्यवस्थीत शिकवणं हेच यामागचे कारण असावे. खोखो व बुद्धीबळ या स्पर्धेत विभागीय ठिकाणी विद्यार्थ्यांना नेणारा हा वाटाड्या. आनंदअश्रु व गावभर ढोलताशांच्या गजरात मिरवणूक अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा निरोप समारंभ संपन्न झाला.