गोरेगाव येथील गोकुळधाम हायस्कुलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना एका चौदा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. शार्दूल संजय आरोळकर असे मृत मुलाचे नाव असून तो याच शाळेची अन्य शाखा असलेल्या यशोधाम शाळेत नववी इयत्तेत शिकत होता. याप्रकरणी दिंडोशी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बोरिवली येथील योगीनगर परिसरात शार्दूल कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शार्दुलचे वडील दिंडोशी येथील न्यायालयात नोकरीला आहेत. शुक्रवारी शाळा आटोपल्यानंतर शार्दूल नेहमीप्रमाणे गोकुळधाम शाळेतील स्विमिंग पूल मध्ये पोहोण्यासाठी गेला. गेल्या सहा महिन्यांपासून शार्दूल या ठिकाणी पोहण्याचे धडे घेत होता. तीन ते चार प्रशिक्षक त्याला पोहण्याचे प्रशिक्षण देत होते.
गुरुवारी साडेबारा वाजता पोहत असताना अचानक तो स्विमिंग पूलमध्ये बुडू लागला. प्रशिक्षकांनी त्याला त्वरित बाहेर काढले आणि जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र येथील डॉक्टरांनी त्याला शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. शार्दूल याला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिस घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचले. शार्दूल याच्या वडिलांकडून तसेच प्रशिक्षकांकडून घटनेची सविस्तर माहिती घेण्यात आली. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. शार्दूल याला पोहण्यास येत होते तसेच तो उंच देखील होता. असे असतानाही तो नेमका कसा बुडाला? हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर आणि तपासातून समोर येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.