धनश्री जगताप मृत्यू प्रकरणात तिच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणात कारवाई करण्यात पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याचादेखील आरोप धनश्रीच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे धनश्रीच्या माहेरच्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथील रहिवासी आप्पासो मोरे यांची मुलगी धनश्री हिचा विवाह संदीप गौतम जगताप याच्याशी झाला होता. ४ मार्च २०२६ रोजी धनश्रीचा विहिरीत पडून संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी ७ मार्च रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी पती संदीप जगताप याला अटक केली आहे, मात्र सासरे गौतम दाजी जगताप आणि सासू रंजना गौतम जगताप हे अद्याप फरार आहेत.
पोलीस कर्मचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न?
धनश्रीचे वडील आप्पासो मोरे यांनी १४ मार्च रोजी मंगळवेढा पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. धनश्रीचा दीर, सत्यजित गौतम जगताप हा स्वतः पोलीस कर्मचारी आहे. त्याच्यावर वारंवार मानसिक त्रास दिल्याचा आरोप असूनही पोलीस त्याच्याविरोधात तक्रार नोंदवून घेत नसल्याचे पत्रात म्हटले आहे. या गुन्ह्यात सत्यजितचाही सहभाग उघडकीस येऊ शकतो, त्यामुळे त्यालाही आरोपी करून अटक करण्याची मागणी मोरे कुटुंबीयांनी केली आहे.
कुटुंबीयांनी उपस्थित केलेले १० खळबळजनक सवाल:
सोशल मीडियावर ‘मला न्याय मिळेल का?’ या मथळ्याखाली कुटुंबीयांनी तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत:
१. मुलगी स्वतःचा मोबाईल घरी ठेवून विहिरीकडे कशी गेली, विशेषतः जेव्हा तिला विहीर कुठे आहे हेच माहीत नव्हते?
२. जर ती विहिरीकडे गेली, तर तिचा मोबाईल सासूकडे कसा आला?
३. विहिरीत २० फूट पाणी असताना आणि विहिरीला पायऱ्या नसताना बॉडी कोणी आणि कशी बाहेर काढली? याचा पंचनामा कुठे आहे?
४. सासू व इतर नातेवाईकांनी आधी ‘मुलगी हरवली’ असे सांगितले, मग त्यांना अचानक कसे समजले की ती त्यांच्याच विहिरीत पडली आहे?
५. पती संदीप याने वारंवार केलेल्या छळाचे पुरावे मोबाईलमध्ये असूनही ते का तपासले गेले नाहीत?
६. सर्व आरोपींचे कॉल रेकॉर्डिंग आणि लोकेशन का तपासले जात नाहीये?
तीव्र आंदोलनाचा इशारा
वारंवार पोलीस स्टेशनचे उंबरे झिजवूनही तपास पुढे सरकत नसल्याने मोरे कुटुंबीय हतबल झाले आहेत. “फरार सासू-सासरे आणि दीर सत्यजित यांना तात्काळ अटक करून योग्य तपास न केल्यास, आम्ही सर्व नातेवाईक पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयासमोर उपोषणाला बसू आणि तीव्र आंदोलन करू,” असा सज्जड इशारा धनश्रीच्या वडिलांनी दिला आहे. आता मंगळवेढा पोलीस या प्रकरणात काय पावले उचलतात आणि धनश्रीला न्याय मिळणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
