• Sun. Mar 15th, 2026

    कोल्हापूरच्या पर्यटन वैभवात कागलच्या पर्यटन व नौकायन केंद्रामुळे भर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 15, 2026
    कोल्हापूरच्या पर्यटन वैभवात कागलच्या पर्यटन व नौकायन केंद्रामुळे भर – महासंवाद

    कोल्हापूर, दि. १५ :  कागल शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या कै. व्हि. ए. घाटगे पर्यटन व नौकायन केंद्र (पाझर तलाव) परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अत्यंत उत्साहात संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘कृत्रिम कासव आकाराचा धबधबा’ आणि ‘रेनडान्स’चे लोकार्पण करण्यात आले, तसेच पर्यटकांच्या निवासासाठी प्रस्तावित असलेल्या भव्य ‘लेक व्ह्यू रिसॉर्ट’चे भूमिपूजनही करण्यात आले. कागल नगरपरिषदेच्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचा नगरपालिकेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

    १५ कोटींच्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. झालेल्या कामांबाबत यावेळी चित्रफीत दाखवण्यात आली. आजच्या सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, कागल नगराध्यक्ष सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, माजी आमदार संजयबाबा घाटगे, अखिलेशराजे घाटगे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्यासह कागल नगरपालिकेचे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

    कागल नगरपरिषदेने ‘नाविन्यपूर्ण योजना २०२४-२५’ अंतर्गत कामांच्या टप्पा दोन मध्ये सुमारे १ कोटी ६९ लाख रुपये खर्चून म्युजिकल सिस्टिमसह हा कासव आकाराचा धबधबा विकसित केला आहे. तसेच, ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान २०२५-२६’ अंतर्गत सुमारे ४ कोटी रुपये खर्चून ‘लेक व्ह्यू रिसॉर्ट’ उभारले जाणार आहे. दररोज सरासरी एक हजार पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता, येथे पर्यावरणपूरक उपाययोजना म्हणून पाण्याचे रिसायकलिंग, सोलर पार्क आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. या सर्व सोयीसुविधांमुळे कागलचा पाझर तलाव परिसर आता जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येत आहे.

    ०००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed