• Sat. Sep 21st, 2024
Pune Crime: बसवर दगडफेक, मध्यरात्री गाड्यांची तोडफोड, कोयत्याने वार; पुण्यात गुंडांची दहशत

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरात अल्पवयीन मुलांच्या टोळक्यांनी, कोयतेधारी गुंडांनी आणि कोयता गँगने पुन्हा उच्छाद मांडण्यास सुरुवात केली आहे. तळजाई पठार आणि वारजे माळवाडी परिसरात टोळक्यांनी तीस ते चाळीस वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली. वाहनांची तोडफोड, कोयत्याने वार, पीएमपी बसवर दगडफेक अशा घटना वाढल्याने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

धनकवडी भागातील तळजाई पठार परिसरात टोळक्याने मध्यरात्री रस्त्याच्या कडेला लावलेल्या २० ते २५ वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. टोळक्याने स्थानिकांना शिवीगाळ करून दहशत पसरवली. टोळक्याने शस्त्रे आणि दांडक्याने रस्त्याच्या कडेला लावलेल्या रिक्षा, कार, दुचाकी, टेम्पोच्या काचा फोडल्या. तळजाई वसाहत परिसरात कष्टकरी वर्ग राहतो. काही वर्षांपूर्वी या भागातील ३० ते ४० वाहनांची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली होती.

टोळक्याने उगारले कोयते

दुसरी घटना वारजे माळवाडी परिसरात घडली. टोळक्याने कॅनॉल रस्त्यावर कोयते उगारून नागरिकांना शिवीगाळ केली. टोळक्याने नागेश्वर महादेव मंदिराजवळ लावलेल्या कारच्या काचा फोडल्या. रहिवाशांना शिवीगाळ करून दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वारजे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. दगडफेकीत दोन रिक्षा, एक जीप, दोन कार, दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बसवर दगडफेक

पीएमपी चालकाला मारहाण करून बसवर दगडफेक केल्याची घटना कर्वेनगर उड्डाणपुलाजवळ घडली. या प्रकरणी वारजे पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीएमपी चालक ज्ञानेश्वर शिंदे (वय ३४, रा. किश्किंदानगर, कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. भोसरी ते वारजे या मार्गावरील बस कर्वेनगर भागातून जात होती. त्या वेळी कर्वेनगर उड्डाणपुलाजवळ एक दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने येत होता. दुचाकीस्वार तरुण आणि साथीदाराने पीएमपी बसचालक शिंदे यांना शिवीगाळ केली. दुचाकीस्वार आणि साथीदाराने रस्त्यावर पडलेला दगड काचेवर मारला. बसची काच फुटून चालक शिंदे यांच्या बोटाला लागल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. शिंदे यांना मारहाण करून दुचाकीस्वार आणि साथीदार पसार झाला.

कोयता गँगचा बंदोबस्त करा

शहर आणि उपनगरांमध्ये कोयतेधारी टोळक्यांनी उच्छाद मांडल्याने कोयता गँगचा बंदोबस्त करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे. वारजे आणि आसपासच्या भागातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गृहमंत्र्यांनी आदेश देऊन पोलिसांनी कडक कारवाई करावी, असे आवाहन सुळे यांनी केले आहे. शहरात कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. कोयता गँगमधील सराईत वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवत आहेत. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed