व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नागपूर जिल्ह्यातील असल्याचा म्हटलं जात आहे. बाईकमध्ये पेट्रोल भरत असताना दुचाकीस्वाराचा फोन वाजतो. खिशातून फोन काढताच त्याची दुचाकी अचानक पेट घेते. दुचाकीत पेट्रोल भरत असताना मोबाईल संपर्कात येताच आग लागते. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती तातडीने दुचाकी सोडून बाजूला उभी राहिली व उपस्थित कर्मचाऱ्यांनी पेट्रोल पंपावर फायर सेफ्टी कॉल सुरू करून आग आटोक्यात आणली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. ही धक्कादायक घटना आणि तितकाच भयानक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पेट्रोल भरताना काळजी घ्या
पेट्रोल भरताना वाहनाचे इंजिन बंद करा. इंधन भरताना वाहन जास्त गरम झाल्यास आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी वाहन बंद करणे केव्हाही चांगले.
पेट्रोल पंप परिसरात धुम्रपान करू नका. तसेच कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ सोबत ठेवू नका. इथे छोटीशी ठिणगीही मोठा अपघात घडवू शकते.
आजकाल जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. मोबाईल फोन सतत कानाला चिकटलेला असतो. पेट्रोल पंप परिसरात मोबाईलवर बोलणे टाळा. त्यातून निघणाऱ्या रेडिएशनमुळे आग लागण्याची शक्यता आहे. प्लास्टिक किंवा काचेच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल घेऊन जाणे धोकादायक आहे. असा धोका पत्करू नका.
