• Sat. Sep 21st, 2024
नाशिक शहरात अवैध तंबाखूजन्य पदार्थ विक्री; म्हसरूळमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहरात अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांसह विक्री करणाऱ्यांची धरपकड सुरू असताना, दुसरीकडे हॉटेल्सच्या नावाखाली हुक्क्याचा चोरीछुपे धूर ओढला जात असल्याची धक्कादायक बाब उघड होत आहे. आडगाव-म्हसरुळ लिंक रस्त्यावरील हॉटेल कॅटल हाउसमध्ये पोलिसांनी नुकताच छापा मारून, प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी हॉटेल मालकासह व्यवस्थापकावर म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी उपनगर पोलिसांनी पाथर्डी रस्त्यावरील पेरू फार्ममध्ये अवैध मद्यविक्री आणि हुक्कासंदर्भात गुन्हे दाखल केले. त्यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथकानेही कारवाई केली होती. आता म्हसरूळ परिसरात अवैधरित्या हॉटेलात हुक्क्याची विक्री केल्याने मालक संशयित सौरभ संजय देशमुख (३२, रा. देशमुख वस्ती, म्हसरूळ-आडगाव लिंक रोड) आणि व्यवस्थापक सुरेंद्र प्रेमसिंग धामी (२९, रा. हॉटेल कॅटल हाउस) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करन्सी नोट प्रेसमधून नोटा गहाळ झाल्याची अफवाच; प्रेस मजदूर संघाच्या सरचिटणीसांचा खुलासा
पोलिस अंमलदार पंकज चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, हॉटेल कॅटल हाउसमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर चालविला जात असल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री सापळा रचला. प्रतिबंधित सुगंधित हुक्का विक्री सुरू असल्याची खात्री पटताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखुजन्य पदार्थ व हुक्का पिण्याचे साहित्य असा १८ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे हॉटेल चालकांचे धाबे पुन्हा दणाणले आहे.

विकेंड पार्ट्यांचे काय?

कॉलेजरोड, गंगापूररोड, चांदशी, त्र्यंबकरोडसह शहरातील अनेक ठिकाणच्या रेस्टॉरंट व हॉटेलांत ‘विकेंड पार्टी’ रंगत आहेत. गंभीर बाब म्हणजे, काही पार्ट्यांमध्ये तरुणाई सर्रास ई-सिगारेटसह हुक्क्याचे सेवन करीत असल्याचे समजते. या रेस्टॉरंटच्या पार्ट्यांमध्ये वाजणाऱ्या पाश्चात्य संगीताचा आवाजही रस्त्यापर्यंत येतो. मात्र, त्या तुलनेत पोलिसांची कारवाई अगदी नगण्य आहे. काही आस्थापनांवर फक्त दखल म्हणून कारवाई केली जात असल्याचा नागरिकांचा दावा आहे. त्यामुळे पोलिसांनी कोम्बिंगपाठोपाठ हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या पार्ट्यांमध्येही तपासणी सत्र राबवण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed