स्थानिक इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी काँग्रेसचे दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दोन तासांच्या या शोकसभेत अनेकांना अश्रू अनावर झाले. आठवणींना उजाळा देताना गहिवरून आले. संवाद प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने सर्व राजकीय पक्ष, शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संघटनांच्या वतीने या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शोकसंवेदना व्यक्त करताना दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आठवणींना उजाळा दिला. महिला सक्ष्मीकरणाच्या गोष्टी सारेच करतात. परंतु महिलांना घराचा उंबरठा ओलांडू देत नाही. मात्र खासदारांनी मला राजकारणात आले. साध्या गृहिणीला आमदार केले. महिला सक्ष्मीकरणाची सुरुवात घरातून केली. पतीच्या निधनानंतर खंबीर होण्याचा सल्ला हितचिंतक देतात. मात्र आमच्या कुटुंबीयांवर आलेले संकट आणि आमच्या भावना कुणी समजू शकणार नाही, असं प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.
खासदार म्हणून काम करताना त्यांनी माणूस म्हणून संबंध जोपासले. पक्षाचा, जातीचा कधी विचार केला नाही. आव्हान पेलणारं नेतृत्व होते. लोक साठ-सत्तर वर्षांचे आयुष्य जगतात. मला पन्नास वर्षांचे जगायचे आहे. जाईन तेव्हा सर्वांना हळहळ लावून जाईन. शासकीय इतमामात जाईन. माझ्यावर किती लोक प्रेम करीत होते, हे स्मशानभूमीतील गर्दी सांगेल, असे ते म्हणायचे, प्रत्येक शब्द खरा करुन दाखविण्याची त्यांची जिद्द असायची. दुर्दैवाने हा शब्द सुद्धा त्यांनी खरा केला, असे सांगत आमदार प्रतिभा धानोरकर निःशब्द झाल्या.
तत्पूर्वी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडोओद्वारे शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यांच्याशी आपले कौटुंबिक संबंध होते, असे गडकरी यांनी सांगितले.
धानोरकर हे लढवय्या होते. त्यांचे अकाली जाणे मनाला चटका लावून गेले. त्यांच्या जाण्याने पक्षाचे आणि लोकसभा मतदार संघाचे नुकसान झाले, अशा शब्दात आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, आमदार अभिजित वंजारी यांनीही शोकसंवेदना व्यक्त केला.
याप्रसंगी माजी आमदार वामनराव चटप, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्यासह बाळू खोब्रागडे, मधुसूदन रुंगठा, मजहर अली, बळीराज धोटे, विनोद दत्तात्रेय, अॅड. विजय मोगरे, चंदू वासाडे, डॉ. अभिलाषा गावतुरे, अनिरुद्ध वनकर, पप्पू देशमुख आणि तृतीय पंथीयांचे प्रतिनिधी म्हणून साजन यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संवाद प्रतिष्ठानचे प्रा. विजय बदखल यांनी केले. दिवगंत खासदारांना सर्वपक्षीय शोकसंवेदना देण्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय संस्कृती किती उदात्त आहे, याचे दर्शन झाले, असे ते म्हणाले.