सिंदेवाही (जि. चंद्रपूर) तालुका क्रीडा संकुलाच्या सुधारित आराखड्यास मान्यता- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. ९ : सिंदेवाही (जि. चंद्रपूर) तालुका क्रीडा संकुलात आवश्यक क्रीडा सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. राज्य क्रीडा विकास समितीमार्फत या क्रीडा संकुलाच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य अभिजित वंजारी यांनी सिंदेवाही (जि. चंद्रपूर) तालुका क्रीडा संकुलातील सुविधांबाबत विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सदाभाऊ खोत, भाई जगताप, प्रवीण दरेकर आणि अमोल मिटकरी यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, या क्रीडा संकुलासाठी एक कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर सुधारित आराखडा व अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या क्रीडा संकुलात हॉकी ॲस्ट्रोटर्फ व ४०० मीटर धावनमार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.
हे क्रीडा संकुल शहरातील बसस्थानकापासून अडीच किलोमीटर आणि रेल्वे स्थानकापासून दीड किलोमीटरवर असून संकुलापर्यंत डांबरी रस्ताही उपलब्ध आहे. त्यामुळे खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना येथे येण्यासाठी कोणतीही गैरसोय नसल्याचे त्यांनी सांगितले.
या क्रीडा संकुलासाठी आवश्यक नवीन सुविधा दिल्या जातील असे सांगत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, या क्रीडा संकुल संदर्भात सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सर्व सदस्यांची बैठक घेतली जाईल. पोलादपूर येथील क्रीडा संकुलबाबतही बैठक घेतली जाईल. अकोला जिल्हा क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असेही मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले.
०००००
एकनाथ पोवार/विसंअ
समतानगर पुनर्विकास प्रकल्प एप्रिलपासून पुन्हा सुरू होणार; कामाचा दर तीन महिन्यांनी आढावा – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. ९ : समतानगर कांदिवली (पूर्व) येथील मध्यम उत्पन्न गटाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम १ एप्रिल २०२६ पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. या कामाच्या प्रगतीचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाईल. या कामात विलंब झाल्यास विकासकावर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषदेत या विषयी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भाई जगताप, प्रवीण दरेकर, अनिल परब यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, समतानगर येथील प्रकल्पासंदर्भात राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या प्रकल्पातील ३१८ निष्कासित सदनिकाधारकांपैकी ३१० जणांचे भाडे मार्च २०२६ पर्यंत देण्यात आले असून उर्वरित आठ जणांचे भाडे देण्याचे आदेशही देण्यात येतील. तसेच दरवर्षीचे भाडे आगावू देण्याबाबत सूचित केले जाईल.
तसेच भाडेकरूंना देय असलेल्या भाड्याबाबत कोणतीही तक्रार राहू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.
अधिवेशन संपल्यानंतर सर्व संबंधितांची या विषयी पुन्हा बैठक घेतली जाईल. या बैठकीस लोकप्रतिनिधी, म्हाडा अधिकारी तसेच गृहनिर्माण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, भाडेकरूंचे प्रतिनिधी यांनाही निमंत्रित केले जाईल असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.
००००
ऐकनाथ पोवार/वि.सं.अ
बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि.०९ : मुंबईतील बेस्ट बससेवाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईतील सर्व स्थानिक आमदार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. या बैठकीस परिवहन विभागाचे अधिकारी यांनाही बोलवण्यात येईल असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रवीण दरेकर, सचिन अहिर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणल्या, मुंबईची लोकसंख्या आणि प्रवाशांची गरज लक्षात घेता शहरात किमान १० हजार बसची आवश्यकता आहे. यासाठी बेस्टने विविध कंत्राटदारांना ६,५५५ बस पुरवठ्यासाठी वर्क ऑर्डर दिल्या होत्या. मात्र कंत्राटदारांकडून बस वेळेत उपलब्ध होऊ न शकल्याने अपेक्षित प्रमाणात बससेवा वाढवता आली नाही. मार्च २०२३ पर्यंत १,३०० बस उपलब्ध होणे अपेक्षित होते, मात्र सध्या केवळ ६८५ बस उपलब्ध झाल्या आहेत.
स्क्रॅपिंग पॉलिसीनुसार १५ वर्षांनंतर बस स्क्रॅप केल्या जात असल्याने बेस्टच्या मालकीच्या बसची संख्या कमी झाली आहे. पूर्वी बेस्टकडे १,८८२ मालकीच्या बस होत्या, मात्र सध्या ही संख्या २४९ इतकी राहिली आहे. उर्वरित बस भाडेतत्त्वावर घेतल्या असून सध्या २,५५८ भाडेतत्त्वावरील बस उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
0000
शैलजा पाटील/विसंअ
