जळगावच्या चाळीसगावमध्ये विमा हडपण्यासाठी मेहुणबारे पोलीस आणि डॉक्टरांनी मिळून रचलेला ५० लाखांचा बनाव उघड झाला आहे. मृताच्या फोटोवरील तारखेने रॅकेटचा पर्दाफाश केला असून १० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
आजाराने मृत्यू, कागदावर अपघात
मालेगाव येथील राजेंद्र शालंदर जाधव यांचा प्रत्यक्षात २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृत (लिव्हर) आजाराने मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्या नावावर ५० लाख रुपयांचा पर्सनल एक्सिडेंट इन्शुरन्स काढण्यात आला होता. मृताची पत्नी अरुणा जाधव यांनी विमा कंपनीकडे दावा करताना १९ एप्रिल २०२५ रोजी दैवत फाट्याजवळ चारचाकी वाहनाच्या धडकेत अपघात झाल्याचे सांगितले. तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले.
फोटोवरील तारखेने उघड झाला बनाव
ज्या कंपनीकडून विमा काढण्यात आला होता, त्या श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तपासासाठी मयताच्या घरी भेट दिली. तपासादरम्यान घरातील भिंतीवर लावलेल्या फोटोवर मृत्यूची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ अशी स्पष्ट लिहिलेली आढळली. त्यामुळे अपघाती मृत्यूचा दावा खोटा असल्याचे विमा कंपनीच्या निदर्शनास आले आणि संपूर्ण बनाव उघडकीस आला.
Sunetra Pawar : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक, राष्ट्रवादीने पहिल्यांदाच अर्ज मागवले, नेत्यांचे नातेवाईकही स्पर्धेत
डॉक्टरांकडून बनावट वैद्यकीय कागदपत्रे
चाळीसगाव येथील डॉक्टर मंदार करंबळेकर यांच्यावर तसेच ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंदार बडेकर यांच्यावर बनावट वैद्यकीय कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. अपघाती मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र तयार करून देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग
मेहुणबारे पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील, रवींद्र बत्तीशे, सचिन निकम आणि सुनील निकम यांनी अपघाताची खोटी एफआयआर दाखल करण्यास मदत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे.
चार ते पाच कोटींच्या घोटाळ्याची शक्यता
तपासात असेही समोर आले आहे की, केवळ एका कंपनीलाच नव्हे तर अशाच पद्धतीने सुमारे दहा वेगवेगळ्या विमा कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणातून जवळपास चार ते पाच कोटी रुपयांचा विमा घोटाळा उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Kolhapur Crime: दुसर्या लेकीच्या जन्मामुळे बाप नाराज, आई-पत्नीशी सतत भांडणं; शेवटी सख्ख्या भावानेच त्याला संपवलं
मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता
ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर मंदार करंबळेकर यांच्या कार्यकाळात अशाप्रकारे आणखी किती बनावट प्रमाणपत्रे देण्यात आली आणि यामागे कोणते दलाल सक्रिय आहेत, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून सरकारी यंत्रणेतच काही जण गुन्हेगारांना मदत करत असल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
