• Mon. Mar 9th, 2026

    Solapur Accident: शेवटचा पेपर देऊन अनिकेत पोहायला गेला, पण सणादिवशीच अनर्थ घडला; कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

    Solapur Accident: शेवटचा पेपर देऊन अनिकेत पोहायला गेला, पण सणादिवशीच अनर्थ घडला; कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

    Accident News: अनिकेत बाबरे हा सोलापुरातील एका महाविद्यालयात विज्ञान शाखेचे शिक्षण घेत होता. मित्रांसह घराबाहेर पडलेल्या अनिकेतचा थेट मृतदेहच घरी आल्याने कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला.

    शेवटचा पेपर देऊन अनिकेत पोहायला गेला, पण सणादिवशीच अनर्थ घडला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सोलापूर: सोलापुरात रंग पंचमीला एक दुर्दैवी घटना घडली असून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रंग पंचमी असल्याने तरुणाने घरात सांगितले होते की, रंग खेळायला जाणार आहे. रंग पंचमीला मित्रासोबत पोहायला गेलेला हा तरुण घरी परतलाच नाही. अनिकेत केवल बाबरे(वय 17 वर्षे, रा मिलिंद नगर, सोलापूर) या महाविद्यालयीन तरुणाचा हिप्परगा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

    अनिकेत बाबरे हा महाविद्यालीन शिक्षण घेत असून शनिवारी त्याचा शेवटचा विज्ञानाचा पेपर होता. पेपर देऊन रंगपंचमीचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या अनिकेतचा रविवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मित्रासोबत पोहायला गेलेला अनिकेत परतलाच नाही!

    मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या अनिकेतचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोलापूर शहराजवळ असलेल्या हिप्परगा तलावातील पाण्यात बुडून त्याची प्राणज्योत मालवली. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रविवारी दुपारी रंग खेळतो, असे सांगून तो घरातून गेला होता. त्यानंतर ही घटना घडली, अशी माहिती सूत्रांनी दिली. अनिकेत बाबरे हा चंडक महाविद्यालयात विज्ञान शाखेत होता. मित्रांसह गेलेल्या अनिकेतचा थेट मृतदेहच घरी आल्याने कुटुंबीयांनी आक्रोश केला.

    तलावात उडी मारली, मात्र अनिकेतचा पाय अडकला

    अनिकेत बाबरे हा रविवारी चार ते पाच मित्रांसोबत रंग खेळण्यासाठी बाहेर पडला. तेथून दुपारी हिप्परगा तलाव येथे पोहण्यासाठी गेला. त्याने उडी मारल्यानंतर तो खाली अडकला. एक तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती गावकऱ्यांना कळाल्यानंतर त्यांनी शोध सुरू केला. त्याचा शोध लागताच त्याला बाहेर काढून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला तिथे मृत घोषित केले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा