मिळालेल्या माहितीनुसार, भोंडवेवाडी गावच्या हद्दीत बाळू नामक मेंढपाळ त्याच्या मेंढ्या चारत असताना त्यास कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मेंढपाळाने तात्काळ याची माहिती भोंडवेवाडी गावच्या पोलीस पाटील प्रज्ञा कैलास भोसले यांना दिली. भोसले यांनी याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात खबर दिली.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. पाहणी केली असता त्यांना अंदाजे ६० ते ६५ वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. सदरचा मृतदेह पूर्णतः सडलेल्या अवस्थेत होता. मृतदेहावर कातडी उरलेली नव्हती. केवळ हाडाचा सांगाडा होता. या मृतदेहाचे कुत्र्यांनी अक्षरश: लचके तोडलेले होते. अन्न-पाणी न मिळाल्याने हा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात पोलिस पाटील प्रज्ञा भोसले यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करत त्यावर अंत्यसंस्कार केले.
बारामती तालुक्यातील शिरसुफळ गावच्या हद्दीतील तलावात छातीवर आणि दोन्ही पायाला दोरीने दगड बांधून एका अनोळखी पुरुषाला फेकून दिल्याची घटना २५ मे रोजी निदर्शनास आली होती. याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून याबाबतचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व तालुका पोलीस करत आहेत. ही घटना ताजी असतानाच अवघ्या १९ दिवसात भोंडेवाडी गावातील ही दुसरी घटना समोर आली आहे.