शिवतीर्थ परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या नावे चौक विकसित करून सुशोभिकरणाची कामे करण्यात येणार आहेत. याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली १६ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बोलावलेल्या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बैठकी आधीच शिवतीर्थाच्या कामावरून तसेच पोवई नाक्यावरील चौकाला बाळासाहेब देसाईंचे नाव देण्यावरून उदयनराजे आणि शंभूराज देसाई या दोघांमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी तातडीने शिवतीर्थावर धाव घेऊन पाहणी केली. त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष रंजना राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते. शिवतीर्थावर कोणताही बदल, नामांतर किंवा कोणत्याही इतर महापुरुषांचे स्मारक उभारण्याला आमचा कडाडून विरोध असेल, अशी भूमिका असल्याचे माजी नगराध्यक्षा रंजना राऊत यांनी स्पष्ट केले आहे. सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे प्रमुख महारुद्र तिकुंडे यांनीही तीव्र आंदोलन करून हे प्रकरण हाणून पाडू, असे स्पष्ट केले आहे. इतरही शिवप्रेमी संघटनांनी नाराजी व्यक्त करून आंदोलन करण्याची तयारी दाखवली आहे.
गेल्या तीन महिन्यांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांच्या वॉलपेंटींगवरूनही शहरात काही दिवस तणावाचे वातावरण होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाजवळच हे वॉल पेंटिंग काढल्याने वाद उफाळून आला होता. यावेळी उदयनराजेंचे समर्थक आक्रमक झाले होते. हा वाद जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचला होता. त्यांनी सुवर्णमध्य साधून हा वाद मिटवला होता. उदयनराजेंचे पेंटिंगही पूर्ण झालं होतं. मात्र, आता पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवतीर्थाच्या नामांतरण व सुशोभीकरण आढावा बैठक आयोजित केल्याच्या कारणावरून खासदार उदयनराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई आमने-सामने येण्याची शक्यता आहे. या बैठकीला उदयनराजे समर्थकांकडून कडाडून विरोध होत आहे. हा प्रतिष्ठेचा विषय बनल्याने शहरातील वातावरण ढवळून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.