उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगावात निसर्गोपचार केंद्राची निर्मिती केली जाणार असल्याची घोषणा आज अर्थसंकल्पात करण्यात आली. पण या निर्णयावरुन उद्धव ठाकरे यांनी ‘मानसोपचार केंद्र’ म्हणत खोचक टोला लगावला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी राज्याचे अर्थसंकल्प सादर केले. या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील दरेगावात निसर्गोपचार केंद्र सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात आली. पण या निसर्गोपचार केंद्रावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. “एक बरं झालं की, एका ठिकाणी ते मानसोपचार केंद्र काढत आहेत. त्याची खरंच गरज आहे. सर्वांसाठी नाही. बाकी सगळे हुशार आहेत. पण मानसोपचार केंद्र योग्य ठिकाणी सुरु करत आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला एकनाथ शिंदेंनी देखील एका वाक्यात उत्तर दिलं. “आम्ही मानसोपचारही करु, विरोधकांचा ताण तणाव दूर करु”, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं.
उद्धव ठाकरे काय-काय म्हणाले?
“एक तर वृक्ष का तोडताय? 300 कोटी वृक्ष लागवडाची घोषणा करताय, पण त्यासाठी जमीन कुठे आहे ते नकाशावर दाखवा. जसं एखाद्या प्रकल्पासाठी तुम्ही जमीन अधिग्रहण करता, शेतकरी किंवा इतर सगळ्यांना उद्ध्वस्त करता. एखादं बंदर असेल तर शेतकऱ्यांना तिथून हुसकावून लावता. तसं वृक्ष लागवडीसाठी जमीन कुठे आहे त आधी नकाशावर दाखवा. तिथे जमिनीसाठी आरक्षण आणणार आहात का? हे सांगा.” Uddhav Thackeray : ‘विकासाचं मृगजळ दाखवणारा, कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प’, उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर टीका “काँक्रीटचे रस्ते करताना सिमेंट हे कुणाकडून खरेदी करणार ते उघड आहे. जवळपास 60 ते 70 टक्के सिमेंटचा पुरवठा हा एकाच कंत्राटदाराच्या विविध कंपन्याकडून केला जातो. एवढे रस्ते कुणी मागितले आहेत? या रस्त्याने जायचं कुठे? बुलेट ट्रेनने अहमदाबादला मराठी माणूस जाणार आहे का?””निधीसाठी पैसे कुठून आणणार? 2047 पर्यंत हे सरकार टिकणार नाही. भाजप टिकणार नाही. मग तोपर्यंत कर्जाचा डोंगर राज्यावर लादणार आहेत ते कर्ज फेडणार कोण? कंत्राटदारांसाठी रस्ते आणि महामार्ग आहेत. तरुणांना नोकरीसाठी काय आहे, AI म्हणजे काय, नेमकं कशात नोकरी मिळणार आहे? याबाबत कुठेही सविस्तर उल्लेख नाही.”
“मी शेतकऱ्यांना सांगेन हे लबाडा घरचं आवतन आहे. अजूनही त्यांनी 2017 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जी कर्जमाफी केली होती ती योजना अजूनही चालू आहे. ती कधी पूर्ण करणार? आम्ही सुरु केली आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण केली. आजची योजना कधीपासून सुरु होईल आणि पूर्ण होईल की ती सुद्धा 2047 पर्यंत सुरु राहील? शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचं आश्वासन कधी पूर्ण होईल?”.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा