भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांनी पीडित महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली मानपाडा पोलिस ठाण्यात जोशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि या गुन्हयाचे तीव्र पडसाद शहरासह भाजप शिवसेनेच्या राजकारणात उमटले होते. भाजपने जोशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. पोलिस अधिकारी शेखर बागडे यांना शिवसेना पाठिशी घालत असून जोशी यांच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्याचे मनोबल खच्चीकरण करुन त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होत आहे. त्यामुळे भाजपच्या बैठकीत शिवसेनेला कल्याण लोकसभेत सहाकार्य न करण्याचा ठराव मंजूर केला.या प्रकरणावरुन राजकारण अधिक तापले आहे. यातच आता पीडित महिलाने मानपाडा पोलीस ठाण्यासमोरच गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसली आहे.
याबाबत पीडित महिलेने सांगितले की, मी येथे चार दिवसापासून उपोषणाला बसली आहे. नंदू जोशी यांना अटक करावी आणि मला न्याय मिळावा. नंदू जोशी हे भाजप मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती. ते माझ्या नवऱ्याचे मित्र होते, ते नेहमी घरी यायचे ते माझ्या पतीचे पार्टनर आहेत. त्या दोघांचे पार्टनरशिप मध्ये व्यवसाय चालू आहेत त्यामुळे त्याच आमच्या घरी येणंजाणं आहे. आता नंदू जोशी यांना अटक व्हावी आणि पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना परत आणावे, हीच माझी मागणी आहे. दरम्यान नंदू जोशी यांना अटक करत नाही तो पर्यंत उपोषणाला बसणार, असेही पीडित महिलेने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भाजपचा आक्रमक पवित्रा
ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदार संघ आपले होते आणि यापुढेही राहतील, असा दावा भाजप नेत्यांनी करताच मेळाव्याला उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देऊन त्याला प्रतिसाद दिला. तर दुसरीकडे डोंबिवलीत भाजपने पत्रकार परिषद घेत मानपाडा पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणावर मनसेने आपली प्रतिक्रिया देत सांगितले की समस्यांपासून लक्ष वळवण्यासाठी भाजप – शिवसेना (शिंदे गटाची) ही खेळी सुरू आहे. शिवसेना-भाजप युती शंभर टक्के होणार व कल्याण लोकसभेत शिवसेनेचा उमेदवार राहणार हे सर्व पुन्हा एकत्र काम करणार, असा दावा पाटील यांनी केला होता.