फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, कलिनाने दिलेल्या माहितीनुसार, चरबीच्या ऊतींमध्ये किंवा हाडांमध्ये विष शोधून काढणं कठीण आहे. पण जे जे हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक डॉक्टरांनी सोमवारी पूर्ण केलेल्या शवविच्छेदनादरम्यान ते शक्य झालं पण वैद्य यांनी स्वत: च्या मर्जीने विष घेतले की त्यांना तसं करण्यास भाग पाडलं गेलं हे शोधणं अशक्य आहे.
मनोज सानेचा गुन्हा कसा सिद्ध होणार?
या प्रकरणात पोलिसांसाठी चिंतेची बाब अशी की, वैद्य यांचा लिव्ह इन पार्टनर मनोज साने (५६), ज्यावर हत्या, करवतीने मृतदेह कापण्याचा आणि काही अवयवांची विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे, याला फार कमी शिक्षा होईल. कारण, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तो फक्त २ ते ५ वर्षांच्या तुरुंगवासात सुटू शकतो. माजी आयपीएस अधिकारी-वकील वाय पी सिंग यांनी म्हटल्याप्रमाणे, जर तपास एजन्सी खून सिद्ध करण्यात अपयशी ठरली तर आरोपीवर आयपीसी कलम २०१(गुन्ह्याचा पुरावा गायब होणे, किंवा गुन्हेगाराला खोटी माहिती देणे) आणि ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. (आत्महत्येस प्रवृत्त करणे).
शवविच्छेदनानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले…
पोलिसांनी पुढील तपासासाठी सोमवारी मनोज सानेला मीरा रोडच्या फ्लॅटमध्ये नेलं होतं. जिथे त्याने सरस्वती वैद्य हिची हत्या केली, तिच्या शरीराचे अवयव- करवतीने कापले, ते कुकरमध्ये उकडले आणि बाहेर फेकून दिले. या सर्व अवयवांची डीएनए प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली आणि शवविच्छेदनानंतर जेजे रुग्णालयाने अवयव तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केले. त्यानंतर लगेचच अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांनी वैद्य यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पूर्ण केले आहे, जे गुरुवारी नयानगर पोलिसांनी पाठवले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून वैद्य आणि त्यांच्या ३ मोठ्या बहिणींचे डीएनए नमुनेही कलिना इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. ३४ वर्षीय वैद्य यांच्या मृतदेहाचे अवयव पोलिसांना ७ जून रोजी गीता आकाशदीप इमारतीच्या फ्लॅटमध्ये सापडले होते. यानंतर मनोज साने (५६) याला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली असून तो पोलीस कोठडीत आहे.
सरस्वती वैद्य यांची हत्या की आत्महत्या?
पोलिसांनी सांगितल्यानुसार, ही हत्या ४ जून रोजी झाल्याचा संशय आहे आणि सानेने प्रेशर कुकिंग करण्यापूर्वी करवतीने मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि दुर्गंधी नियंत्रणात आणण्यासाठी आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने हे अवयव स्वयंपाकघरात कापले. आरोपी साने याने असा दावा केला आहे की, त्याने वैद्य यांची हत्या केली नसून तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. पण आपण खुनाच्या गुन्ह्यात अडकू यामुळे त्याने मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं. या निर्दयी माणसाने चक्क करवतीने वैद्य यांचे हातपाय आणि केसांचा काही भाग कापला. यामुळे आता त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधणंही कठीण झालं आहे.