चक्रीवादळामुळे वाऱ्यांची दिशा बदलली आहे. यामुळे उत्तर मुंबईच्या दिशेने येणारे वारे हे दक्षिणेकडून येत आहेत. कुलाबा येथे मात्र वाऱ्यांची दिशा आग्नेयकडून आहे. परिणामी कुलाबा येथे ३४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईच्या पश्चिमेला असल्याने त्याचा परिणाम म्हणून मुंबईकरांनी रविवारीही वेगाने वाहत असलेले वारे अनुभवले. मात्र दोन्ही दिवशी या वाऱ्यांची तापमान कमी होण्यासाठी मदत झाली नाही.
सांताक्रूझ येथील कमाल तापमान शनिवारपेक्षा ०.२ अंशांनी खाली उतरले. तरीही हे तापमान सरासरीपेक्षा ५.४ अंशांनी अधिक आहे. सांताक्रूझ येथे सकाळी आर्द्रता ५९ टक्के होती तर सायंकाळी ४८ टक्के. हवेतील आर्द्रता खेचून घेतल्याने मुंबईमध्ये त्यातही प्रामुख्याने उपनगरांमध्ये भट्टीसारखी जाणीव होत होती अशी भावना मुंबईकरांनी व्यक्त केली. कुलाबा येथील तापमान शनिवारी आणि रविवारी दोन्ही दिवस ३४.५ अंश सेल्सिअस होते. हे तापमानही सरासरीपेक्षा २ अंशांनी अधिक होते. शनिवारी संध्याकाळी तसेच रविवारी संध्याकाळी मुंबई शहर परिसरात तुरळक सरी पडल्या. मुंबई शहर परिसरामध्ये दुपारी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांनी तापमान नियंत्रणासाठी थोडी मदत केल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. हा परिणाम मुंबई उपनगरांमध्ये दिसला नाही. त्यामुळे उपनगरामध्ये पारा चढाच राहिला.
चक्रीवादळाचा परिणाम डहाणूवरही दिसला. डहाणू येथेही रविवारी पारा चढा होता. डहाणू येथे सरासरीपेक्षा ४.८ अंशांनी अधिक तापमान नोंद झाली आणि कमाल तापमान ३८.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. उत्तर महाराष्ट्रात जळगाव येथेही तापमान चढेच होते. बिपरजॉय चक्रीवादळ रविवारी दुपारी मुंबईच्या पश्चिमेला ५४० किलोमीटर अंतरावर होते. १४ तारखेला सकाळपर्यंत ते वायव्य दिशेने प्रवास करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
किमान तापमान चढेच राहणार
चक्रीवादळ पुढे सरकेल तशी पुन्हा एकदा वाऱ्यांची दिशाही बदलेल. त्यामुळे मुंबईकरांना गेल्या तीन दिवसांमध्ये अनुभवलेल्या तापमानाच्या चटक्यांपासून दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारी कमाल तापमान ३४पर्यंत खाली येईल असे अनुमान वर्तवले आहे. आता पावसाळी ऋतू असल्याने किमान तापमान मात्र चढेच राहील.
सलग दुसऱ्या दिवशी मुंबईचा पारा चढा असतानाच, रविवारी सायंकाळी पडलेल्या रिमझिम पावसाने मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा दिला.
संजय हडकर