• Mon. Nov 25th, 2024

    शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचे शक्तिप्रदर्शन; युतीतील ताणलेल्या संबंधांना आणखी एक धक्का?

    शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचे शक्तिप्रदर्शन; युतीतील ताणलेल्या संबंधांना आणखी एक धक्का?

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : शिवसेना-भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात ठाण्यात भाजपचा पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा होत आहे. मोदी सरकारने नऊ वर्षांत राबविलेल्या विविध योजनांचा प्रचार करण्याच्या निमित्ताने रविवार, ११ जूनला भाजपचा हा मेळावा ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात होत असून या मेळाव्याला तीन कॅबिनेट मंत्र्यांसह या भागातील स्थानिक आमदार व माजी खासदार पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत. युतीतील वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच भाजपच्या या शक्तिप्रदर्शनाचे येथील स्थानिक राजकारणावर काय पडसाद उमटतात, यावरून शिवसेना-भाजप युतीचे आगामी काळातील भवितव्य ठरणार आहे.

    डोंबिवलीतील भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. त्यामुळे शिंदे गट व भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला होता. त्यावरून जोशी यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदविणारे मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांचे निलंबन होईपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाला सहकार्य करायचे नाही आणि त्यांच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकायचा, असा ठरावच या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मंथन बैठकीत करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे. ठाणे लोकसभा मतदार संघाच्या या मेळाव्याला भाजप नेते व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला आमदार संजय केळकर, आमदार गणेश नाईक, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात शिंदे गट आणि भाजपच्या ताणलेल्या संबंधांना या मेळाव्यातून धक्का बसतो की दोन्हीकडील पदाधिकाऱ्यांचे सूर जुळून येतात, हे पाहावे लागणार आहे.

    शरद पवारांच्या एका निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रियांच्या ताब्यात, लोकसभा तिकीटवाटप सुळेंच्या हातात

    राजीनामा अस्त्राची सोशल मीडियावर चर्चा

    शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे. तसेच युतीमध्ये विघ्न निर्माण होत असेल तर माझी माझ्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे, असे सांगत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी व्हिडीओ शेअर केला होता. मात्र २०१४ मध्येही कल्याण – डोंबिवली पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन भाजप सरकारकडून शिवसैनिकांवर दडपशाही केली जात असल्याचा आरोप करत कल्याण पूर्वेतील सभेत तेव्हा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामापत्र दिले होते. या घटनेचा संदर्भ देत सोशल मीडियावर विविध व्हिडीओ वायरल होत असून खासदार शिंदे यांनी उगारलेल्या राजीनामा अस्त्राच्या माध्यमातून त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed