• Mon. Nov 25th, 2024
    Sant Dnyaneshwar Palkhi : अलंकापुरी दुमदुमली, आज होणार माउलींच्या पालखीचे प्रस्थान, असा आहे कार्यक्रम

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी ः आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज, रविवारी (११ जून) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्यासाठी अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा जमला असून, माउलीनामाचा अखंड जयघोष चालू आहे.

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक दाखल झाले आहेत. श्री क्षेत्र आळंदीत भक्तीचा जनसागर लोटला आहे. इंद्रायणीचा घाट, विविध धर्मशाळा, सिद्धबेट, मंदिरे ही ठिकाणे गर्दीने व्यापली आहेत. दिव्यांच्या प्रकाशझोतामुळे सोपान पुलावरील दर्शनबारी झगमगली आहे. नदी घाटावर ज्ञानेश्वरीची पारायणे सुरू आहेत. सर्वत्र हरिनामाचा अखंड गजर होत आहे.

    पालखी प्रस्थानाच्या दिवशी मुख्य मंदिरात मानाच्या निवडक ४७ दिंड्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. सायंकाळी चारनंतर प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. श्री गुरू हैबतबाबा यांच्यातर्फे श्रींची आरती केली जाईल. त्यानंतर संस्थानतर्फे आरती म्हणण्यात येईल. नारळप्रसाद, विधीवत मानपानाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर माउलींच्या मानाच्या दोन्ही अश्वांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. वीणा मंडपात श्रींच्या चलपादुका प्राणप्रतिष्ठापित केल्या जातील. मानकऱ्यांना पागोडी वाटप केले जाईल. त्यानंतर महाद्वारातून पालखी प्रस्थान होऊन सोहळा प्रदक्षिणा मार्गाने आजोळघरी मुक्कामासाठी जाणार आहे.

    दरम्यान, पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्हा परिषद, आरोग्य विभाग यांच्या वतीने आळंदी येथे आरोग्य दिंडी उपक्रम राबविण्यात आला. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-माउलींच्या जयघोषात आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली. विशेषतः उष्माघात, हिवताप, डेंगी, क्षयरोग, कुष्ठरोग याविषयी जागृती करण्यात आली. फलकांद्वारे जोखमीच्या विषयांची माहिती देण्यात आली.

    वारकऱ्यांसाठी Good News! पंढरीची वारी आणखी सुखकर होणार, हवामान विभागाची मोठी मदत
    पालखी प्रस्थान कार्यक्रम पत्रिका

    पहाटे ४ ते ४.१५ घंटानाद, काकडा

    पहाटे ४.१५ ते ५.३० पवमान अभिषेक, दुधारती

    पहाटे ५.३० ते ९ भक्तांच्या महापूजा, समाधी दर्शन

    सकाळी ९ ते १२ पालखी सोहळा कीर्तन

    दुपारी १२.३० ते २ गाभारा स्वच्छता, श्रींना नैवेद्य

    सायंकाळी ४ पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ

    तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

    ‘उंच पताका झळकती, टाळ मृदंग वाजती’ अशा उत्साहपूर्ण आणि ऊन, सावली, पावसाच्या वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी शनिवारी (१० जून) दुपारी चारच्या सुमारास देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. ‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग’ या ओढीने पुण्यभूमी देहू धन्य झाले होते. इंद्रायणी नदीचा तीर भाविकांच्या गर्दीने फुलला होता. पहाटेपासूनच अभंगाच्या सुरावटीने भाविकांना जाग आली. पहाटे पाच वाजता परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात विश्वस्तांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधी पूजेनंतर पालखी प्रस्थाननिमित्त देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांची विधीवत पूजा करण्यात आली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed