• Mon. Nov 25th, 2024

    खंडणीसाठी चक्क कायदेशीर नोटरी; कथित वृक्षप्रेमीच्या प्रतापाने नाशिकमध्ये खळबळ, काय घडलं?

    खंडणीसाठी चक्क कायदेशीर नोटरी; कथित वृक्षप्रेमीच्या प्रतापाने नाशिकमध्ये खळबळ, काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : वृक्षतोडीसाठी महापालिकेने नेमलेल्या ठेकेदाराविरोधात ऑनलाइन तक्रार करण्यासह त्याचा ठेका रद्द करणे टाळण्यासाठी कथित वृक्षप्रेमीने खंडणी मागितल्याची बाब उघड झाली आहे.

    काय आहे प्रकरण?

    संशयित दीपक त्र्यंबक जाधव (वय ४०) याच्यावर गंगापूर पोलिसांत खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जाधव याने खंडणीसाठी चक्क कायदेशीर नोटरी केल्याने खळबळ उडाली आहे. महापालिकेतर्फे परवानगीनुसार वृक्ष तोडण्यासाठी नितीन प्रभाकर कोठावदे यांना ठेका देण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात ऑनलाइन तक्रार करेल, त्यांचा ठेका रद्द करेल, वृक्षतोड होत असल्यास त्यावर हरकत घेईल, या स्वरूपाच्या धमक्या देत दरमहा वीस हजार रुपये खंडणी मागण्याचा ‘उद्योग’ जाधव याने केला आहे. कोठावदे यांनी दरमहिन्याच्या २ तारखेला हप्ता द्यायचा, असे चक्क नोटरीच जाधव याने करून घेतले. हे नोटरी कोठवदे यांच्याकडे दिल्यावर ते थेट गंगापूर पोलिसांत पोहोचले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्वरित खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्या अन्वये, शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जाधव हा वृक्षप्रेमी नसून, केवळ पैसे कमावण्यासाठी त्याने हा प्रकार केला आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्येही संताप व्यक्त होत आहे.

    लॉकअपमधील संशयिताचा स्वतःला संपविण्याचा प्रयत्न; फरशी तोडून मनगटाची नस कापली, काय कारण?
    पत्रकार असल्याचीही धमकी

    संशयित जाधव हा माजी नगरसेवकाच्या पुतण्या असल्याचे समजते. त्याने स्थानिक वेबपोर्टलचा पत्रकार असल्याची बतावणी केल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. वृक्षतोडीसंदर्भात बातम्या देत, वृक्षतोडीबाबत हरकती नोंदवून ठेका रद्द करण्यापर्यंत पाठपुरावा करण्याची धमकी जाधवने कोठावदे यांना दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून, त्याने थेट नोटरीच केल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed