नव्वद टक्क्यांहून अधिक मार्क मिळवणारे विद्यार्थी खुश असतातच, पण आजूबाजूच्या मित्रांचे मार्क पाहून त्यांना आणखी चुटपूट लागते. ७०-८० टक्केवाल्यांनाही थोडंसं चुकल्यासारखं वाटतं. ५०-५५ वाले बऱ्याचदा नाराज असतात. कारण आणखी मार्क पडले असते, तर फर्स्ट क्लास असता, असं वाटत राहतं. पण ३५ गुण मिळवणाऱ्यांइतके समाधानी कोणीच नसतात. कारण एखाद्या विषयातही एखादा मार्क कमी पडला असता, तरी वर्ष पणाला लागलं असतं. त्यामुळे पास झाल्याचं समाधान मोठं असतं. आणखी एक-दोन टक्क्यांचाही त्यांना हव्यास नसतो.
वैभव म्हणाला की, मी अभ्यास केला होता, पण तिथे गेल्यावर जेवढं आठवलं तेवढं पेपरमध्ये लिहिले. मला वाटलं नव्हतं की मला सर्व विषयात ३५ गुण मिळतील. मी जेवढा अभ्यास केला, तेवढं लिहून पास झालो. माझ्या मित्रांना देखील मला असे मार्क्स पडल्याने आश्चर्य वाटले. वैभवला शाळेतील शिक्षकांचे देखील मार्गदर्शन लाभले. गुण बघून वैभवच्या तोंडातून दोनच शब्द फुटले होते, ते म्हणजे ‘भारी ना’…
वैभवला शिक्षणात थोडा फार रस आहे. बाकीच्या वेळेत तो आपल्या आई वडिलांना शेतात मदत करतो. तर उरलेल्या वेळात तो क्रिकेट आणि कबड्डी खेळतो. येणाऱ्या काळात त्याला व्यावसायिक शिक्षणात रस असून त्याचे काहीतरी करण्याचा विचार असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याच्या या गुणांची सर्वत्र हवा आहे.