• Sat. Sep 21st, 2024

Nashik News : महाऊर्जा कुसुम योजना ‘आउट ऑफ कव्हरेज’; अधिकाऱ्यांचे मोबाइल, हेल्पलाइनही बंद

Nashik News : महाऊर्जा कुसुम योजना ‘आउट ऑफ कव्हरेज’; अधिकाऱ्यांचे मोबाइल, हेल्पलाइनही बंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : किमान मूल्यामध्ये शेतकऱ्यांना सौरपंप उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यामार्फत अंमलात आणलेली महाऊर्जा कुसुम योजना काही दिवसांपासून ‘आउट ऑफ कव्हरेज’ आहे. शासनाने आवाहन केलेल्या वेबसाइट्स आणि हेल्पलाइन बंद असून, विभागीय अधिकाऱ्यांचे मोबाइल फोनही ‘स्वीच्ड ऑफ’ असल्याने शेतकऱ्यांनी कोणाकडे संपर्क साधावा, अशी स्थिती नाशिक विभागात निर्माण झाली आहे.शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणामार्फत (महाऊर्जा) ‘पंतप्रधान कुसुम’ ही राबविण्यात येते आहे. आतापर्यंत सौर कृषीपंप घेण्यासाठी राज्यभरातून २३ हजार ५८४ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. नाशिकमधून १७६९ अर्ज महाऊर्जाकडे प्राप्त झाले असले, तरी सौरपंपासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून एकाचवेळी अर्ज केले जात असल्याने संकेतस्थळावर विलंब लागत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, सरकारने स्वत: आवाहन करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाइन्स किंवा महाऊर्जाच्या विभागीय अधिकाऱ्यांचे मोबाइल्स असोत बंद का आहेत, असा सवाल शेतकरी संघटनांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने जिल्हास्तरावर महाऊर्जाने कोटा वाढवून द्यावा, अशीही मागणी होत आहे.

शेती सिंचन करणाऱ्या कृषिपंपांना सौरऊर्जेचे बळ देण्यासाठी केंद्राकडून ‘पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान योजना’ (पीएम-कुसुम) राबविण्यात येते. या योजनेंतर्गत केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने राज्यात दरवर्षी एक लाख यानुसार पुढील पाच वर्षांत ५ लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

या योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्याला सौर कृषीपंपाच्या किमतीच्या ९० टक्के व अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्याला सौर कृषीपंपाच्या किमतीच्या ९५ टक्के अनुदान देण्यात येते. त्यासाठी ‘महाऊर्जा’मार्फत १७ मेपासून ‘कुसुम योजने’चे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार उपलब्ध कोट्यात ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ असा निकष ठेवण्यात आला आहे. संकेतस्थळ कार्यान्वित करून तीन आठवडे उलटले आहेत. शेतकऱ्यांनी मध्यरात्री संकेतस्थळावर अर्ज भरण्याचा प्रयत्न केला तरी पुढील प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत आहेत.
कोकणातल्या शेतकऱ्यांनी पुढचं पाऊल टाकलं,रेशीम शेतीत यश मिळवलं, आता राज्य सरकार मोठं गिफ्ट देणार?
या हेल्पलाइन्स बंद

‘पीएम-कुसुम’ योजनेत शेतजमिनीच्या आकारानुसार तीन, पाच आणि साडेसात अश्वशक्ती क्षमतेचे पारेषणविरहीत सौर कृषिपंप देण्यात येतात. अडीच एकरापर्यंत शेतीसाठी तीन अश्वशक्ती, पाच एकर शेतजमिनीसाठी पाच अश्वशक्ती व त्यापेक्षा जास्त शेतजमीनधारकाला साडेसात अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषिपंप दिले जातात. त्यासाठी शेतकऱ्यांनी ‘महाऊर्जा’च्या संकेतस्थळावरूनच ऑनलाइन अर्ज करावा, इतर कोणत्याही बनावट किंवा फसव्या संकेतस्थळाचा वापर करू नये, असे आवाहन एकीकडे सरकार करते तर दुसरीकडे याबाबत जाणवणाऱ्या अडचणी निवारणासाठी ०२०-३५०००४५६ किंवा ०२०-३५०००४५७ या हेल्पलाइन्सला फोन केल्यास त्या सर्रास बंद असल्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed