सांगली शहरातील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला मिरजेत आणलं. यानंतर तिच्यावर अत्याचार करून गळा चिरून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रसाद मोतुगडे-माळी ( वय २०, राहणार ब्राह्मणपुरी, मिरज) या नराधमावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सांगली राहणारी पीडीत मुलगी आणि प्रसाद याची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. आणि यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते.
दरम्यान, शुक्रवारी प्रसाद याने पीडित मुलीचे सांगलीतून तिच्या घराजवळून रिक्षातून अपहरण केलं होतं. यानंतर मिरजेतील एका ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तिच्या गळ्यावर कटरने वार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली. पीडित मुलीला तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. तर या घटने प्रकरणी मिरज शहर पोलिसात नराधम प्रसाद मोतुगडे-माळी याच्या विरोधात अपहरण, पोक्सो, ॲट्रॉसिटी आणि अत्याचार तसेच हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिलडा हे करत आहेत.
जखमी पीडित तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात आलं आहे. तर आरोपी प्रसाद हा फरार असून त्याचा शोध मिरज पोलीस घेत आहेत. प्रसाद याने आधी रिक्षेतून मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर तो राहत असलेल्या मिरज शहरातील ब्राह्मणपुरे येथील भाड्याच्या खोलीत तरुणीला नेलं. त्याने इथे तिच्यावर आत्याचार केला. यावेळी विरोध केल्याने आरोपी प्रसाद याने त्याच्याकडे असणाऱ्या कटरने मुलीच्या हातावर वार केला. त्यानंतरही आरडाओरडा केल्यावर त्याने पीडित मुलीच्या गळ्यावर वार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला.