म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : तत्कालीन हैदराबादच्या निजामाचे राज्य असलेल्या भागातून हज यात्रेला जाणाऱ्यांसाठी मक्का शहरात ‘रूबात’ची (मोफत राहण्याची) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मराठवाड्यासह तेलंगण या भागातील निवडक यात्रेकरूंना या ठिकाणी राहण्याची मोफत सुविधा दिली जाते. ती मिळाल्यास मराठवाड्यातील हज यात्रेकरूंची तीस ते चाळीस हजार रुपयांची बचत होत होती. यंदा ही ‘रूबात’ सुविधा मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.तत्कालीन निजाम शासनाने त्यांच्या राज्यातून हज यात्रेसाठी जाणाऱ्यांसाठी मक्केत विविध इमारती उभारल्या होत्या. त्यास ‘रूबात’ असे म्हटले जाते. त्या तीन इमारती आहेत. याला ‘बक्तुंबा १ ते ३’ अशी नावे देण्यात आली आहेत. मक्का शहरात हज आणि उमराहसाठी असलेल्या महत्त्वाच्या धार्मिक स्थळापासून या इमारतीचे अंतर दोन ते तीन किलोमीटर आहे. पूर्वी या इमारती मुख्य धार्मिक स्थळाजवळ होत्या. यामुळे नागरिकांना इमारतीतून थेट मुख्य धार्मिक स्थळापर्यंत जाता येत होते. मक्का शहरातील मुख्य धार्मिक स्थळामधील सुविधांचा विस्तार होत असल्याने, या इमारतीसाठी दुसरी जागा देण्यात आली आहे. या इमारतींमध्ये एकूण १२०० हज यात्रेकरूंना राहण्याची सुविधा आहे. यात ११०० मराठवाडा, कर्नाटकचा काही भाग तसेच तेलंगण या भागातील हज यात्रेकरूंना हज यात्रेदरम्यान राहण्यासाठी जागा दिली जाते. तर १०० जणांच्या राहण्याची जागा ही निजामांच्या वंशजांसाठी असते.
लॉटरी पद्धतीने होते निवड
जुन्या निजाम राज्यातील नागरिकांसाठी ही व्यवस्था असल्याने, पूर्वी हैदराबादच्या कार्यालयातून नागरिक पत्र घेऊन हज समितीकडे जमा करीत होते. आता ही व्यवस्था बदलली आहे. आता हज यात्रेसाठी पात्र ठरलेल्या मराठवाडा, तेलंगणच्या हज यात्रेकरूंची नावाची यादी घेऊन लॉटरी पद्धतीने रूबातसाठी हज यात्रेकरूंची निवड केली जाते. यंदा ही व्यवस्था आहे किंवा नाही. याची अधिकृत घोषणा झालेली नाही.
Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेसाठीचे महत्त्वाचे अपडेट, नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
अशी होती योजना…
स्वातंत्र्यपूर्व काळात निजाम शासनाच्या काळात जेव्हा सौदी अरेबिया हज, उमराह यात्रा आणि इतर सुविधांद्वारे देश म्हणून विकास करीत होता. त्यांच्याकडे पेट्रोलचा शोध लागलेला नव्हता. त्यावेळी निजाम शासनाने सौदी अरेबियात ही गुंतवणूक केली होती. त्या काळात निजामांची ही गुंतवणूक खूप मोठी होती. त्यावेळी हज यात्रा जहाजांद्वारे तसेच उंटावरून होत होती. त्या काळात आपल्या राज्यातील नागरिकांना त्या देशात राहता यावे, यासाठी ‘रूबात’ बांधून व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली.