• Sat. Sep 21st, 2024

शिक्षण विभागात खळबळ: बड्या महिला अधिकारी ५० हजारांची लाच घेताना अडकल्या जाळ्यात

शिक्षण विभागात खळबळ: बड्या महिला अधिकारी ५० हजारांची लाच घेताना अडकल्या जाळ्यात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांना पन्नास हजारांची लाच घेताना महापालिकेच्या कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी रंगेहाथ ताब्यात घेतल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.विभागातील कनिष्ठ लिपिक नितीन जोशी यांनाही या कारवाईदरम्यान पाच हजार रुपये घेताना ताब्यात घेण्यात आले. निलंबित मुख्याध्यापकाला न्यायाधीकरणाच्या आदेशानंतर शाळेत पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश देण्यासाठी ही लाच घेण्यात आली. या प्रकरणी धनगर यांच्या चौकशीसह रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. धनगर यांनी पन्नास हजार आणि लिपिकाने पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी ५० वर्षीय तक्रारदाराने ‘एसीबी’कडे संपर्क साधला. लाचेच्या मागणीची पडताळणी करून सापळा लावण्यासाठी अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी आदेश दिले. त्या अन्वये पोलिस निरीक्षक संदीप घुगे, गायत्री जाधव, अंमलदार एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन आणि नितीन नेटारे धनकर यांना शुक्रवारी (दि. २) सायंकाळी पाच वाजता ताब्यात घेतले. संशयित सुनीता सुभाष धनगर (वय ५७, रा. रचित सनशाइन, उंटवाडी) आणि नितीन अनिल जोशी (४५, पुष्पांकुर, तपोवन) यांच्या चौकशीसाठी एक पथक रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. धनगर या वर्ग-२ च्या अधिकारी असल्याने त्यांच्या घरासह मालमत्तेची झडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

आदेशासाठी लाच

एका खासगी शिक्षण संस्थेच्या हिंदी माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना काही कारणास्तव संस्थेने निलंबित केले. त्याविरोधात त्याने शैक्षणिक न्यायाधीकरणात दाद मागितली. न्यायाधीकरणाने मुख्याध्यापकांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, तरीही संस्थेने त्यांना नियुक्त करण्यास नकार दिला. त्यामुळे शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी धनगर यांच्याकडे मुख्याध्यापकांनी अर्ज केला. संस्थेला नियुक्ती करण्याबाबचे आदेश देण्यासाठी धनगर व लिपिकाने लाच घेतली.

डॉ. झनकरांचे आठ लाख

एका आदर्श शिक्षकासह शासकीय वाहनचालकासमवेत तत्कालीन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांनी आठ लाख रुपये घेतले होते. ठाणे ‘एसीबी’ने ऑगस्ट २०२१ मध्ये ही कारवाई केली होती. तेव्हा, तक्रारदाराला शासनाचे २० टक्के अनुदान मंजूर झाले होते. त्यानुसार शिक्षकांचे वेतन २० अनुदानाच्या नियमानुसार करण्याची मंजुरी मिळावी, अशी मागणी संस्थेने शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली. या मंजुरीसाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. सध्या डॉ. झनकर या रायगड जिल्ह्यात कार्यरत आहेत.

नोकरी गेल्याने फसवणुकीचा ‘उद्योग’; मंत्रालयात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणाऱ्याला अटक
कामांचे ‘रेट कार्ड’

धनगर यांच्या लाचखोरीमुळे शिक्षण विभागातील कामांचे ‘रेट कार्ड’ पुन्हा चर्चिले जात आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागात विविध कामांसाठी पैशांची मागणी व्हायची. समस्या, तक्रारी, प्रशासकीय कामांसाठी अनेक जण खेटा मारायचे. अगदी दहा रुपयांपासून पाचशे ते कित्येक हजारांपर्यंत मागणी करण्यात आल्याचा दावा काही तक्रारदारांनी केला आहे. या लाचखोरीला शिक्षण विभागातील सर्वजण वैतागले होते. चौकशीदरम्यान ‘रेट कार्ड’ अधिक स्पष्ट होण्याचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed