मोनिका तेलंगे आणि मंथन हडपसर परिसरात राहतात. मोनिका यांनी परीक्षेत ५१.८ आणि मंथन याने ६४ टक्के गुण मिळवले आहेत. मोनिका या कचरा वेचक आहेत. गेल्या आठ वर्षांपासून त्या स्वच्छ संस्थेमार्फत कचरावेचक कर्मचारी म्हणून काम करत आहेत. मोनिका मूळच्या मुंबईच्या. नववीत शिकत असताना मोनिका यांचे लग्न झाले आणि त्या पुण्यात आल्या. संसार आणि मुलांमुळे त्यांना पुढचं शिक्षण घेणे शक्य झालं नाही. सगळं काही सुरळीत सुरू आहे असे वाटत असतानाच आठ वर्षांपूर्वी पतीचे अकाली निधन झाले. एक मुलगा, मुलगी आणि घरची जबाबदारी अचानक अंगावर आली. परिस्थितीमुळे मुलांचं शिक्षण थांबावयचं नाही, हा ध्यास घेऊन त्यांनी घरची कामे सांभाळून त्यांनी कचरावेचक म्हणून कामाला सुरुवात केली. मुलांच्या अभ्यासातही प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली.
लॉकडाउनमध्ये सर्व काही बंद असल्याने मंथन घरी बसून ऑनलाइन शिक्षण घेत होता. घरात काम करताना शिक्षक शिकवत असलेले धडे माझ्या कानावर पडत होते. शाळा संपल्यावर मी त्याचा अभ्यास घेत असे. याच काळात माझाही अभ्यासातला रस वाढला. लहानपणापासून मला शिकायचे होते, पण परिस्थितीमुळे शक्य झाले नाही. मुलगा दहावीत गेला त्याच वेळी मी देखील परीक्षेचा फॉर्म भरायचं ठरवलं. आम्ही दोघांनी मिळून अभ्यास केला. मला अवघड वाटणाऱ्या गोष्टी मंथनने मला शिकवल्या. त्याला येत नसलेले मी शिकवले. दोघांनी मिळून गृहपाठ केला. आज परीक्षेचा निकाल हातात मिळाल्यावर शब्दात सांगता येणार नाही एवढा आनंद झाला, अशी भावना मोनिका तेलंगे यांनी व्यक्त केली.
मुलाला डॉक्टर बनवायचं
लहानपणापासूनच शिकायची आवड होती, पण परिस्थितीमुळे ते शक्य झाल नाही. मुलानं मला आग्रह करून परीक्षेला बसवलं. त्याच्यामुळे माझं स्वप्न पूर्ण झालं. मी पुढे शिकेन की नाही माहिती नाही, पण मुलाला डॉक्टर व्हायचं आहे, त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हवे तेवढं कष्ट करायची माझी तयारी आहे- मोनिका तेलंगे
आई माझा अभ्यास घेत असताना, मी तिला प्रत्येक वेळी तुला जमेल, ऐक तू.. दहावीची परीक्षा दे असं सांगत होतो. ती परीक्षा पास होईल मला माहिती होते. आमच्या हट्टामुळे तिने दहावीचा फॉर्म भरला. सगळी काम सांभाळून माझ्याबरोबर अभ्यास केला. आज माझ्याबरोबर तिच्याही हातात गुणपत्रिका बघताना खूप छान वाटतं आहे- मंथन तेलंगे