नेमकी घटना काय?
बोंढार हवेली येथे गुरुवारी विवाह सोहळा होता. या विवाह सोहळ्या निमित्त गावात वरात काढण्यात आली होती. वरातीत काही युवक डीजे लावून नाचत होते. त्यावेळी गावातील अक्षय भालेराव हा युवक तिथे आला. यावेळी वरातीत नाचण्यावरुन अक्षय भालेराव आणि नाचणाऱ्या युवकांचा काही कारणावरून वाद होता.
या वादानंतर वरातीतील युवकांनी अचानक अक्षयवर हल्ला चढवला. अक्षयच्या पोटात चाकूने सपासप वार करण्यात आले. यावेळी दोन गटात दगडफेक देखील झाली. काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर अक्षयला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले पण दाखल करण्यापूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला.
९ आरोपींविरुद्ध हत्या आणि ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा
या घटनेने बोंढार हवेली गावात तणाव निर्माण झाला होता.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी ९ आरोपींविरुद्ध हत्या आणि ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
गावात भीम जयंती काढल्याच्या रागातून अक्षयची हत्या, कुटुंबियांचा आरोप
दरम्यान, घटनेनंतर मयताच्या भावाने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. गावात भीम जयंती काढल्याच्या रागातून आरोपींनी अक्षयला जीवे मारल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. अक्षयची हत्या केल्यानंतर आरोपींनी आपला मोर्चा त्याच्या आई आणि भावाकडे वळवला. अक्षयच्या भावाच्या खांद्यावर देखील आरोपींनी वार केले असल्याचं एफआयआरमध्ये म्हटलंय. ही तक्रार मयत अक्षयचा भाऊ आकाश श्रावण भालेराव याने केली आहे.
पोलीस अधीक्षकांचे आवाहन
दरम्यान, या घटनेनंतर बोंढार हवेली गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ पोलिसांचा फौजफाटा लावला होता. सद्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी केले आहे.