रायगडाच्या पायऱ्या चढत असतानाच शिवभक्त असलेला युवा मावळा अचानक खाली कोसळला. या दुर्घटनेनंतर त्याला तात्काळ जवळच्या पाचाड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे शिवभक्तांमधून व परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या युवकाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे अद्याप समजू शकले नाही. मात्र अनेक शिवभक्तांना रोपवेचे तिकीट काढून सुद्धा रोप-वे ने जाता आले नाही. आलेले मंत्री, त्यांचे अंगरक्षक, पोलीस यांनाच रोपे वे मधून जाता आले यामुळे शिवभक्तांमधून रोप-वेच्या नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली
हा युवक नेमका कोणत्या कारणामुळे खाली कोसळला याचं नेमकं कारण समजू शकलेले नाही. त्याला अचानक हृदयविकाराचा झटका की उष्माघातामुळे हे अद्याप समजू शकलेले नाही. थकवा आल्यामुळे किल्ले रायगडावर आलेल्या शिवप्रेमींना उष्माघाताचा भयंकर त्रास झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, १५ हजाराच्या आसपास लोक किल्ले रायगडावर उपस्थित होते. आरोग्य विभागानं प्राथमिक उपचारासाठी सुविधा उपलब्ध केली होती. मात्र, गडावर ज्या ठिकाणी मुख्य कार्यक्रम झाला, त्या परिसरात शोधूनही आरोग्य सुविधा दिसत नव्हती.
रोप वेची सुविधा गडावर जाण्यासाठी आहे. मात्र, सकाळी 4 वाजल्यापासून उत्सव नियोजन समितीचे अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांनीच रोप वेवर अक्षरशः कब्जा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री एकाचवेळी रोप वे जवळ आल्याने यातून सर्वसामन्यांना रोप-वेने जाण्यास मनाई करण्यात आली.
मंत्रिमंडळातील जवळजवळ संपूर्ण मंत्रिमंडळ, त्यांचे सचिव, अंगरक्षक हे सर्व रोप वेने गेल्याने सर्वसामान्य शिवप्रेमींनी तिकीट काढूनही पायी गड चढावा लागला. यात वयोवृद्ध, शारीरिक व्याधी असणाऱ्यांचाही समावेश होता. शिवप्रेमींनीही सरकारच्या नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.