अभय गवळी यांच्या आत्महत्येनंतर त्यांची पत्नी तृप्ती अभय गवळी, सासू उषा जालिंदर आंबवडे, सासरे जालिंदर आंबवडे, मेव्हणा संतोष आंबवडे आणि सारिका आंबवडे या पाच जणांविरोधात हडपसर पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अभय गवळी आणि तृप्ती गवळी यांचा विवाह जानेवारी २०१४ मध्ये झाला होता. ते दोघे पती पत्नी शेवाळेवाडी येथील भडलकरनगर येथे राहण्यास होते.अभय आणि तृप्ती या दोघांचा विवाह झाल्यापासून सासू उषा जालिंदर आंबवडे, सासरे जालिंदर आंबवडे, मेव्हणा संतोष आंबवडे आणि सारिका आंबवडे हे अभय यांच्या संसारात ढवळाढवळ करीत होते.तसेच पत्नी तृप्ती या आई-वडिलांच्या सांगण्यानुसारच वागत होत्या. यावरून दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाले.या सर्व सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अभय गवळी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अभय गवळी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये पत्नी तृप्ती गवळीसह सासरकडील चार जण मंडळी जबाबदार असल्याच म्हटलं आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.