• Sat. Sep 21st, 2024
मजुरी करणाऱ्या संतोषच्या लग्नासाठी अख्खं गाव एकटवलं, वर्गणी काढून धुमधडाक्यात लग्न लावलं

कोल्हापूर: लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले,आजारी आई आणि हातावरचे पोट आणि घरची सर्व जबाबदारी अश्या हालाखीची परिस्थिती संतोष याच्यावर, कमी शिक्षणामुळे मोलमजुरी केल्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र,ज्याच्या मागे कोणी नाही त्याच्या मागे देवरुपी माणसे असतात,असाच काही प्रत्यय हेरवाड येथे दिसून आला. कष्टकरी संतोष याचा विवाह भावकीतील आणि गावातील ग्रामस्थांनी चक्क वर्गणी गोळा करुन श्रीमंतांना लाजवेल अशा धुमधडाक्यात लावला, त्यामुळे या लग्नाची चर्चा हेरवाडसह शिरोळ तालुक्यात रंगली आहे.

संतोष देबाजे हा अशिक्षित तरुण लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले, यातच आजारी आई त्यामुळे दोनवेळच्या जेवणाचे वांदे, आजारी आई असल्याने तिला सांभाळण्यासाठी आणि कुटूंबाचा गाडा पुढे नेण्यासाठी लग्न केल्याशिवाय त्याला पर्याय नव्हता, त्यामुळे कर्नाटक राज्यातील पाहुण्यांनी त्याच्या या परिस्थितीकडे पाहून आपली मुलगी देण्याचा धाडसी निर्णय घेतला, पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे लग्न सोहळा कसा पार पाडायचा, हा प्रश्न उभा राहिला, यावेळी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सुनिल देबाजे व सुभाष देबाजे यांनी काहीही करुन हा लग्न सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला.

अमृता राव आणि RJ अनमोलचा बजेट’विवाह’, केवळ १.२ लाखात झाले लग्न

यासाठी त्यांच्या भावकीमध्ये बैठक झाली आणि प्रत्येकाने वर्गणी काढली, यामध्ये गावातील दानशूर व्यक्तींनीही आपला सहभाग नोंदवून मदतीचा हात पुढे केला. बघता-बघता संतोष देबाजे आणि कर्नाटक राज्यातील रेणू गोरजे यांच्या विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाला.अगदी घरातील बाजारापासून ते मंडप, साऊंड, पाहुण्यांचा आहेर,कपडे आणि जेवणाचे नियोजन समाजातील दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराने झाले.इतकेच नव्हे तर देवधर्म म्हणून गावातील ग्रामदैवत श्री संतुबाई देवीची पालखी, व्हंगाड यासह सर्वच धार्मिक कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. त्यामुळे या लग्नकार्याची चर्चा रंगली आहे.या लग्नकार्यासाठी सुनिल देबाजे,सुभाष देबाजे, सरपंच रेखा जाधव, माजी सरपंच सुरगोंडा पाटील, दिलीप पाटील, प्रथमेश पाटील, शंकर माने यांच्यासह देबाजे भावकी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

सामाजिक कार्यात हेरवाड नेहमी अग्रभागी

विधवा प्रथा बंदी, मृत शेतकर्‍याचे कर्ज लोकवर्गणीतून फेडणे, मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबाला आर्थिक हातभार लावून मदत करणे आणि आता लग्न करण्याची ऐपत नसलेल्या संतोष देबाजेसारख्या तरुणाचा अगदी श्रीमंताला लाजवेल, अशा थाटामाटात लग्न सोहळा पार पाडणे या सर्व सामाजिक कार्यात हेरवाडमधील ग्रामस्थ नेहमी अग्रभागी राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed