म. टा. वृत्तसेवा, वसई : वसई किल्ल्यातील येणाऱ्या काही स्थानिकांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनवण्याच्या नादात थेट किल्ल्यातील चर्चमध्येच आग लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे वसई किल्ल्याची विटंबना झाल्याचा आरोप किल्लाप्रेमींनी केला आहे. या प्रकाराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष असून या विटंबना करणाऱ्या स्थानिक तरुणावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.वसईच्या किल्ल्याला ऐतिहासिक तसेच, पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. या किल्ल्यात बालेकिल्ला, सात विविध चर्च, साखर कारखाना, प्रवेशद्वार, पुरातन मंदिर अशा अनेक वास्तू आहेत. मात्र सध्या यातील अनेक वास्तूंची पडझड होत आहे. तर, दुसरीकडे येथील स्थानिकांमार्फत आणि काही हौशी पर्यटकांमार्फत या किल्ल्याची नासधूसही होत आहे. येथे येणाऱ्या हौशी पर्यटकांमार्फत किल्ल्यात कोणत्याही कड्यावर उभे राहून व्हिडीओ काढणे, छायाचित्रे काढणे यांसारखे प्रकार घडत आहेत. प्री वेडिंग शूट सर्रास सुरू आहे. त्यातच आता इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनवून लाइक्स मिळविणाऱ्या तरुणांची भर पडली आहे.
२ हजार रुपयांच्या नोटा जमा करताना काय काळजी घ्याल? SBI ने सोप्या शब्दांत सांगितल्या नियम-अटीवसई किल्ल्यातील एका चर्चमध्ये एका तरुणाने रील्स बनविण्यासाठी किल्ल्यात आग लावल्याची घटना घडली. त्यामुळे येथील किल्ल्यातील वास्तूंची या तरुणाकडून विटंबना झाली असल्याचा आरोप दुर्गप्रेमींनी केला आहे. याबाबत इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी पुरातत्त्व विभागाकडे ईमेलद्वारे तात्काळ तक्रार केली असून या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याआधीही किल्ल्यातील विविध घटनांबाबत तक्रार केली असता पुरातत्त्व विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. किल्ल्यात विशेषतः मुख्य दरवाजा लावण्याची मागणी त्यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा केली आहे. तसेच, या तरुणावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.