खरेच्या पाच दिवसांच्या तर, पाटीलच्या दोन दिवस तपासानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडी सुनावल्याने दोघांनीही छातीत कळ आल्याचा बहाणा केला. वैद्यकीय तपासणीसाठी पाच वाजेच्या सुमारास दोघांना एसीबी पथकाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना दाखल करून घेण्याचा ‘डाव’ यशस्वी होण्याच्या मार्गावर होता. परंतु, सिव्हिल प्रशासनाच्या काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची हिंमत न झाल्याने त्यांनी नकार दिला. अखेर दोघेही रागात मान खाली घालून साडेसहा वाजता पोलिसांच्या वाहनात येऊन बसले. त्यानंतर दोघांसह राव व शिंदे यांनाही कारागृहात नेण्यात आले.
आजारपणाचे नाट्य!
खरे सिव्हिलमध्ये आल्यावर थेट ‘आयसीयू’कडे गेला. काही वेळाने आपत्कालिन विभागात दाखल झाला. खांद्याला धरून थेट बेडवर झोपला. तेथे सव्वासहा वाजेपर्यंत त्याने आजारपणाचा बनाव केला. तर, डॉ. पाटील येताच आपत्कालिन विभागात पोहोचल्या. तिथल्या एका खुर्चीत बसल्या. बराच वेळ त्यांची तपासणी करण्यासह दोघांनाही ‘अॅडमिट’ करून घेण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी आरोग्य विभागातल्या काही ‘बड्या’ अधिकाऱ्यांनी ‘सेटिंग’ लावल्याचे चर्चिले गेले. परंतु, भीतीपोटी कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ‘धाडस’ न झाल्याने खरेसह डॉ. पाटील व त्यांच्या सेटिंग बहाद्दरांना परत फिरावे लागले.
पाटीलकडे ८१ तोळे सोने
हिवताप अधिकारी डॉ. पाटीलच्या लॉकरमध्ये तब्बल ७१ तोळे आणि घरझडतीमध्ये दहा तोळे असे एकूण ८१ तोळे सोने सापडले. तर, खरेच्याही घरात ५४ तोळे सोन्यासह १६ लाख रुपये व अनेक महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली. दोघांची कारागृहात रवानगी झाल्याने आता सोमवारनंतरच त्यांच्या जामीन प्रक्रियेला सुरुवात होईल.